दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By महेश गलांडे | Published: November 7, 2020 09:07 PM2020-11-07T21:07:40+5:302020-11-07T21:08:41+5:30

मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

Start schools from 9th to 12th after Diwali, CM uddhav thackeray instructs | दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री म्हणाले, जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

मुंबई - विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे. 

शिक्षकांची तपासणी करणार : प्रा. वर्षा गायकवाड 

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी दि. १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. दि.२३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंग करण्यात येईल.

एका विद्यार्थ्यांला एका बेंचवर बसविण्यात येईल, एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने शाळा सुरू कराव्या; तसेच शाळा व्यवस्थित सुरू राहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, असे अप्पर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनी सांगितले.
 

Web Title: Start schools from 9th to 12th after Diwali, CM uddhav thackeray instructs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.