‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 05:30 IST2025-06-25T05:29:06+5:302025-06-25T05:30:29+5:30

मुंबई महानगर प्रदेशात लवकरच लागू; एसटी महामंडळ एनसीएमसी कार्डधारकांसाठी विशेष सवलती देण्याच्या तयारीत आहे.

ST tickets now available on 'Mumbai 1' card! ST's decision after Metro, Mono, Railways | ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय

‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचे तिकीट काढण्यासाठी आता मुंबई वन कार्डचाही वापर करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या तिकिटिंग प्रणालीचे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसोबत (एनसीएमसी) एकात्मीकरण (इंटिग्रेशन) करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीसाठी ‘मुंबई १’ हे एकल कार्ड लवकरच सुरू होणार असून, आता एसटीही त्यात सहभागी होणार आहे.
 
एसटीचे तिकीट यूपीआय आणि संकेतस्थळांद्वारे ऑनलाइन काढता येते. याच पार्श्वभूमीवर आता महामंडळ डिजिटल पेमेंट्सला चालना देत असून, एनसीएमसी कार्डधारकांसाठी विशेष सवलती देण्याच्या तयारीत आहे.

केंद्र सरकारच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेनुसार एसटी महामंडळ आपल्या तिकिटिंग प्रणालीचे या प्रणालीसोबत एकत्रीकरण करणार आहे. यामुळे प्रवाशांना विविध वाहतूक सेवा वापरण्यासाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज भासणार नाही. एकच कार्ड सर्वत्र चालणार असल्याने वेळ आणि त्रास वाचणार आहे.

एनसीएमसी कार्ड म्हणजे काय? 

केंद्र सरकारने सुरू केलेली एकसंध डिजिटल पेमेंट प्रणाली

एकाच कार्डवर सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट खरेदी करता येते

एनएफसी  तंत्रज्ञानावर आधारित

रिअल टाइम व ऑफलाइन व्यवहाराची सोय

रोख रकमेची गरज नाही, डिजिटल व्यवहाराला चालना

आकर्षक सवलतींचा विचार 

एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी होत असली तरी महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक सवलती अशा विविध योजनेत सहभागी होणाऱ्या प्रवाशांची संख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे. 

प्रवाशांना तिकीट खरेदी करणे अधिक सोयीस्कर व्हावे आणि प्रवासी संख्या वाढावी, यासाठी एसटी महामंडळ एनसीएमसी कार्डधारकांना आकर्षक सवलती देण्याचा विचार करत आहे. 

ही योजना एसटी महामंडळाच्या पुनरुज्जीवन आराखड्याचा भाग आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या श्वेतपत्रिकेनुसार एसटी महामंडळाचा आर्थिक तुटीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महामंडळ विविध सुधारणा राबवत आहे. त्यात एनसीएमसी कार्डचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: ST tickets now available on 'Mumbai 1' card! ST's decision after Metro, Mono, Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.