Join us  

एसटी कामगारांच्या वेतनवाढीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:36 AM

गेल्या महिन्याभरापासून रखडलेल्या एसटी कामगारांच्या वेतनवाढ प्रक्रियेस पुन्हा सुरुवात करत, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी, ८ फेब्रुवारीला मान्यताप्राप्त संघटनेला चर्चेसाठी बोलावले आहे.

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून रखडलेल्या एसटी कामगारांच्या वेतनवाढ प्रक्रियेस पुन्हा सुरुवात करत, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी, ८ फेब्रुवारीला मान्यताप्राप्त संघटनेला चर्चेसाठी बोलावले आहे. मुंबईतील एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात दुपारी ३ वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्र एसटी कामगार संघटना या मान्यताप्राप्त संघटनेची कोंडी करण्याची संधी रावते यांना मिळाली आहे.सातव्या वेतन आयोगाची मागणी करत, ऐन दिवाळीत एसटी कामगारांच्या मान्यताप्राप्त संघटनेने संपाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. त्या वेळी रावते यांनी तब्बल १,०७६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करत, कामगारांसोबत ३५ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ करार करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, रावते यांची कोंडी करण्यासाठी मान्यताप्राप्त संघटनेने संप अधिक चिघळविल्याचा आरोप संपादरम्यान झाला. अखेर प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर, वेतनवाढीसाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालात केवळ ५ टक्क्यांची वाढ सुचवली. त्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेची पुरती कोंडी झाली. या अहवालाविरोधात मान्यताप्राप्त संघटनेने कामगारांच्या कुटुंबीयांतर्फे ९ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चाची हाक दिली. मात्र, न्यायालयात प्रकरण असताना मोर्चा काढून काय साध्य होणार, असा सवाल कामगारांनी केला आहे.पेच कायमदरम्यान, कामगारांची अडचण लक्षात घेऊन, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी रावते यांची भेट घेत मध्यस्थीची भूमिका बजावली आहे. कामगारांची भूमिका रावतेंसमोर मांडून, रेडकर यांनी रावते यांना बैठक घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर, रावते यांनी मान्यताप्राप्त संघटनेला चर्चेसाठी आमंत्रण पाठविले आहे. रावते यांचे आमंत्रण धुडकावून उच्चस्तरीय समितीने सुचविलेली ५ टक्के वाढ घ्यायची की, रावते यांनी सुचविलेल्या ३५ टक्के वाढीवर चर्चा करायची, असा पेच कायम असल्याने मान्यताप्राप्त संघटना अडकली आहे.

टॅग्स :मुंबई