Join us  

मुंबईतील भिंतींवर गूढ चित्रं, सोशल मीडियावर शंकाकुशंकांना उधाण

By darshana.tamboli | Published: March 30, 2018 11:35 AM

मुंबईतील भिंतींवर असणाऱ्या या चित्रांमुळे सोशल मीडियावर अनेक शंकांना उधाण आलं आहे.

मुंबई- शहरात असणाऱ्या भिंती, बिलबोर्ड तसंच इतर अनेक ठिकाणी विशिष्ट प्रकारची चित्रं मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईतील भिंतींवर असणाऱ्या या चित्रांमुळे सोशल मीडियावर अनेक शंकांना उधाण आलं आहे. त्रिकोणासारखं दिसेल अशी आकृती व त्याखाली नागमोडी वळणाची रेषा अशा प्रकारची चित्रं पाहायला मिळत आहेत. बँक्सी नावाच्या ब्रिटिश कलाकाराने काढलेल्या चित्राप्रमाणे या कलाकृती दिसत आहेत. 

मुंबईतील माहिम भागात असणाऱ्या विक्टोरीआ चर्चच्या भिंतीवर व दादरमधील शिवसेना भवनजवळ असणाऱ्या कोहीनूर स्क्वेअरच्या भिंतींवर ही चित्रं आढळून आली आहेत. राजकीय व सामाजिक मुद्द्यावर मत मांडण्यासाठी बँक्सीची चित्र रस्त्यांवरील भिंतीवर काढण्यात येतात. जगातील अनेक शहरातील रस्त्यांवर, पुलांवर बँक्सीची अशी चित्र आहेत. 

 

मुंबईतील या चित्रांमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईमध्ये नवा बँक्सी आहे. सुरूवातीला डिसेंबर महिन्यात आम्ही एकाला असं चित्र काढताना पाहिलं होतं. पण ती व्यक्ती समजली नाही, अशी प्रतिक्रिया त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने दिली आहे. 

एल्फिन्स्टन भागात असणाऱ्या इंडिया बुल्सच्या भिंतीवर काढलेलं चित्र हे इतर ठिकाणी असलेल्या चित्रांच्या तुलनेत मोठं आहे, असं एका प्रवाश्याने म्हंटलं. डिसेंबर महिन्यात एक व्यक्ती असं चित्र काढत होती व ती भारतीयच होती, असा दावाही या प्रवाशाने केला आहे. 

 

टॅग्स :मुंबई