Join us  

'समृद्धी'वर वेगाला लागणार ब्रेक, दर १० किमीवर वेग मोजणारे यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 9:30 AM

बेशिस्त वाहनांवर कारवाईसाठी आयटीएमएस उभारणार

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर वाहनांचा वेग मोजणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चाप बसण्यास मदत मिळणार असून, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १ हजार ४९८ कोटी रुपये खर्चुन इंटिलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) बसविण्यात येत आहे. त्यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.

७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर २४ ठिकाणांवरूनच वाहनांना प्रवेश मिळणार आहे. या मार्गावर प्रतितास १५० किलोमीटर वेगमऱ्यादा आखून देण्यात आली आहे. मात्र, सद्य:स्थितीत या मार्गावर प्रतितास १२० किलोमीटरची वेगमर्यादा आहे. मात्र, त्याहून अधिक वेगाने वाहने जाताना दिसतात. तसेच महामार्गावर लेनची शिस्त पाळली जात नाही. त्यातून गंभीर अपघाताचे प्रकार घडले आहेत.

बेशिस्त वाहने चालविणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी आणि महामार्गावरील अपघातादरम्यान तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी विशेष अशी आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येत आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करता येणार आहे. तसेच या यंत्रणेची टोल गोळा करण्यासाठीही मदत मिळणार आहे. 

आयटीएमएस प्रणालीसाठी एनसीसी लिमिटेड आणि अॅमनेक्स इन्फोटेक्नॉलॉजीस यांनी संयुक्त भागीदारीत दाखल केलेली निविदा लघुतम ठरली आहे. त्यांची निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कंपनीला कार्यादेश दिल्यानंतर पुढील २१ महिन्यांत ही यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. 'आयटीएमएस प्रणालीसाठी मागविलेली निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे', अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

आयटीएमएसची वैशिष्ट्ये...

चालकांचे वेगावर लक्ष राहावे यासाठी प्रत्येक २० किमी अंतरावर गाडीचा वेग दाखविणारी यंत्रणा उभारणार. प्रत्येक टीएमसीवर २ ड्रोन यंत्रणा आणि हायवे पोलिसांसाठी दोन स्पीड गन यंत्रणा. महामार्गावर प्रत्येक १०० किमी अंतरावर ट्रॅफिक मॅनेजमेंट केंद्र. बोगद्यात लेन कंट्रोल सिस्टम. प्रत्येक एंट्री, एक्झिट आणि बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर डिजिटल बोर्डाद्वारे माहिती देणार. महामार्गावर प्रत्येकी २ किमीवर, तर बोगद्यात दर २५० मीटर अंतरावर मदतीसाठी अत्यावश्यक कॉल बूथ. दुर्घटनेवेळी संवादासाठी वायरलेस पद्धतीची मोबाइल रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम.

 

टॅग्स :समृद्धी महामार्ग