Join us  

स्वातंत्र्यदिनी रक्तदानाची मुंबईत विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 1:30 AM

कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयाचा पुढाकार

मुंबई : कर्करोग रुग्णांच्या भविष्यातील उपचारांसाठी रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता टाटा मेमोरिअल रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ आॅगस्ट रोजी मुंबईत अल्ट्रा मॅरेथॉन रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.टाटा मेमोरियल सेंटरकडून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून अनेक धावपटू त्यात सहभागी होणार आहेत. ही मॅरेथॉन रक्तदान मोहीम असणार आहे.‘जर आपण धावू शकत नाही तर आपल्या रक्ताला धावू द्या’ असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मुंबई अल्ट्रा मॅरेथॉन धावपटूंनी टीएमसीबरोबर भागीदारी केली आहे आणि सध्याच्या आव्हानात्मक काळाला संधीमध्ये बदलण्याचा हा प्रयत्न आहे.दरवर्षी धावपटू १५ आॅगस्ट रोजी मॅरेथॉन आयोजित करतात आणि टीएमसीमध्ये कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या उपचारासाठी ते समर्पित करतात. यावर्षी कोरोनामुळे मॅरेथॉनचे आयोजन वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे.अल्ट्रा धावपटूंनी स्वातंत्र्यदिनी दादर, वीर सावरकर भवन येथे रक्तदान शिबिर घेण्याचे ठरविले आहे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, दिवसभर देणगी देण्यासाठी जागा नियोजित करणे, पुरेशी स्वच्छता, संरक्षणात्मक गिअरची अंमलबजावणी करणे इत्यादींसह अत्यंत काळजी व सावधगिरी बाळगण्यात येणार आहे. रुग्णसेवा करून अनेकांचे जीव वाचवून माणुसकी जपण्याचे काम येथे होत असल्याची भावना टाटा मेमोरिअलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी व्यक्त केली.