Join us  

अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात विशेष व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 4:23 AM

अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त ३१ जुलै रोजी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे भाविकांना मंदिरात योग्यरीत्या प्रवेश आणि सुलभ दर्शन मिळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई : अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त ३१ जुलै रोजी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे भाविकांना मंदिरात योग्यरीत्या प्रवेश आणि सुलभ दर्शन मिळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ‘श्री’च्या दर्शनाची वेळ येत्या सोमवारी मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.१५ वाजेपर्यंत असणार आहे. मंगळवारी पहाटे ३.५० ते रात्री ८ वाजेपर्यंत आणि त्यानंतर रात्री ९.५० ते रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना मंदिर खुले करण्यात येणार आहे.शंकर घाणेकर मार्ग ते रिद्धी प्रवेशद्वार चेकपोस्ट या दरम्यान उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून, सोमवारी मध्यरात्री १.३० वाजल्यापासून प्रवेशद्वार क्रमांक ६ मधून महिला भाविकांना प्रवेश दिला जाईल. महिला भाविकांसाठी कॉन्व्हेंट हायस्कूल कॉर्नर, तसेच शंकर घाणेकर मार्ग येथे चप्पल स्टँडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.साने गुरुजी प्रवेशद्वारामार्गे उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून सोमवारी मध्यरात्री १.३० वाजल्यापासून मंदिर प्रवेशद्वार क्रमांक ४ मधून पुरुष भाविकांना प्रवेश दिला जाईल. पुरुषांसाठी रवींद्र नाट्य मंदिर प्रवेशद्वार क्रमांक १ व प्रवेशद्वार क्रमांक २ मधून प्रवेश दिला जाणार आहे.एस. के. बोले मार्गावरील आगरबाजार सिद्धी प्रवेशद्वार ते चेकपोस्ट या दरम्यान उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून भाविकांना सोमवारी मध्यरात्री १.३० वाजल्यापासून मंदिर प्रवेशद्वार क्रमांक १ मधून महिला आणि पुरुष भाविकांना मुख दर्शन घेता येईल.सिद्धी प्रवेशद्वार मंदिर सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या आतील बाजूची मार्गिका प्रवेशद्वार क्रमांक ३ मार्गे सोमवारी मध्यरात्री १.३० वाजल्यापासून श्रींच्या दर्शनासाठी अपंग व गरोदर महिला भाविकांना प्रवेश दिला जाईल.श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोमवारी मध्यरात्री १२ ते मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दादर रेल्वे स्थानक येथील केशवसूत पूल ते रवींद्र नाट्य मंदिरपर्यंत ६ बेस्ट बसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानक ते रवींद्र नाट्य मंदिरापर्यंत बेस्टतर्फे मोफत सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे देण्यात आली.भाविकांसाठी सूचनाश्रींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी विचारात घेता, सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येताना मौल्यवान वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिरमुंबई