कल्याण : सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन करूनही चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांत कल्याण-डोंबिवलीत ८ गुन्हे घडल्याने महिलावर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.सोनसाखळी चोरीच्या घटनांना पायबंद घालण्याच्या अनुषंगाने मार्च महिन्यात तब्बल ५०० ते ६०० पोलिसांच्या फौजफाट्यासह इराणी वस्तीत कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले होते. यात काही चोरट्यांना जेरबंद करताना चोरीच्या गुन्ह्यांत वापरलेल्या मोटारसायकली मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईनंतर काही प्रमाणात सोनसाखळी चोरीच्या घटनांना पायबंद बसल्याचे चित्र होते. कल्याणमध्ये आशा भंडारी, सुमन सानप, नंदा रसाळ, सविता रघुवंशी, अरुणा सुतार, अपूर्वा मोडक तर डोंबिवलीमध्ये आशा देशमुख या महिलांच्या गळ्यांतील सोन्याचे दागिने मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी लांबविले आहेत. दरम्यान, कल्याणमध्ये इमारतीच्या लिफ्टबाहेर रजनी मोरे यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या राज सूर्यवंशी या चोरट्यास पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या घटनांप्रकरणी कोळसेवाडी, एमएफसी, बाजारपेठ, रामनगर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, या वाढत्या घटनांमुळे सोनसाखळी चोर पुन्हा एकदा सक्रि य झाल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
कोम्बिंगनंतरही सोनसाखळी चोऱ्या सुरूच
By admin | Updated: May 4, 2015 23:56 IST