Join us  

कपबशी फोडली म्हणून प्रियकराने महिलेच्या तीन वर्षाच्या मुलाची केली हत्या, मुंबईतील घाटकोपरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 2:59 PM

घरातली कपबशी फोडली म्हणून संतापाच्या भरात महिलेच्या प्रियकराने तिच्या तीनवर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केली.

ठळक मुद्देअफसाना ऑगस्ट महिन्यात नाशिकहून मुंबईला येत असताना तिची नितीन पाठारेबरोबर (36) ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले व अफसाना तिच्या दोन मुलांसोबत नितीनच्या घाटकोपर येथील रुमवर राहू लागली.

मुंबई - घरातली कपबशी फोडली म्हणून संतापाच्या भरात प्रियकराने महिलेच्या तीनवर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. मुंबईत घाटकोपर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकल्याची हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह कल्याणच्या हाजी मलंग परिसरात फेकून दिला. त्यानंतर आरोपीने महिलेच्या पाचवर्षाच्या मुलीलाही जिवानिशी संपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

या प्रकरणात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की,  अफसाना कुरेशी (25) या महिलेचा घटस्फोट झाला असून, तिला पहिल्या पतीपासून अहील आणि तमन्ना ही दोन मुले आहेत. अफसाना ऑगस्ट महिन्यात नाशिकहून मुंबईला येत असताना तिची नितीन पाठारेबरोबर (36) ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले व अफसाना तिच्या दोन मुलांसोबत नितीनच्या घाटकोपर येथील रुमवर राहू लागली. नितीन पाठारे अफसाना आणि तिच्या दोन मुलांना बंधकाप्रमाणे वागवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. 

प्रवासात असताना ट्रेनमध्ये ओळख झाल्यानंतर नितीन आणि अफसानाने त्यांचे फोननंबर  परस्परांना  दिले. घटस्फोटानंतर नवरा आपल्या मुलांच्या पालनपोषणाचा खर्च उचलत नसल्याचे अफसानाने नितीनला सांगितले. त्यावेळी नितीनने माझा भाऊ वकिल असून तो तुझ्या नव-याविरोधात कोर्टात खटला दाखल करेल असे तिला सांगितले. त्याने अफसानाला मुंबईला बोलवून घेतले. 

अफसाना 6 सप्टेंबरला तिच्या दोन मुलांसह मुंबईत आली व तिने वकिलाची भेट घेतली. ती त्याचदिवशी परत निघणार होती पण नितीनने तिला लंचसाठी घरी बोलावले. नितीन पाठारे घाटकोपर पूर्वेला शंकरवाडी येथे संतोशी बिल्डींगमध्ये राहतो. अफसाना आणि तिची दोन मुले नितीनच्या घरी गेली. दुपारचे जेवण झाल्यानंतर नितीन अफसाना आणि तिच्या दोन मुलांना गेट वे ऑफ इंडिया, हाजी मलंग येथे फिरायला घेऊन गेला. 

त्या दिवशी अफसाना नितीनच्या घाटकोपर येथील घरी थांबली. दुस-या दिवशी जेव्हा ती जायला निघाली तेव्हा नितीनने तिला धमकावून तिथेच राहण्यास भाग पाडले असे तिने पोलिसांना सांगितले. नितीनचे लग्न झाले होते तरीही त्याने अफसानाला त्याच्यासोबत राहण्यासाठी राजी केले असे पोलिसांनी सांगितले. 27 सप्टेंबरला अफसाना नितीनवर मुलांची जबाबदारी सोपवून नोकरी शोधण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. त्यावेळी घरात खेळत असताना चुकून अहीलच्या हातून एक कप फुटला. त्यामुळे नितीनच्या संतापाचा पारा चढला. त्याने अहिलला बदडून काढले नंतर त्याची गळा आवळून हत्या केली. अफसाना घरी आल्यानंतर नितीनने अहिल खेळत खेळता खाली पडला व त्याचा मृत्यू झाला असे सांगितले. 

नितीनने जे सांगितले त्यावर अफसानाचा अजिबात विश्वास बसला नाही पण नितीनने तिला धमकावले व हाजी मलंग परिसरात मुलाचा मृतदेह दफन केला. अहिलच्या मृत्यूबद्दल कुठे बोललीस तर तू आणि तुझी मुलगी जिवंत राहणार नाही अशी धमकी दिली. 3 ऑक्टोंबरला अफसानाने नितीनला मुलाच्या मृत्यूचा जाब विचारल्यानंतर नितीनने पट्टयाने तिला आणि तिच्या मुलीला बदडून काढले. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.