Join us  

मागासवर्गीय उद्योजकांचे प्रश्न सोडवणार : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यातील मागासवर्गीय उद्योजकांचे अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ऊर्जा मंत्री ...

मुंबई : राज्यातील मागासवर्गीय उद्योजकांचे अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी सांगितले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्था महासंघातर्फे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

डॉ. राऊत म्हणाले, मागासवर्गीय उद्योजकांना वीजपुरवठ्याशी संबंधित विविध योजनांचा लाभ व्हावा आणि त्यांना अखंड वीजपुरवठा मिळावा यासाठी एक कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केली. लोकशाहीची पाळेमुळे आर्थिक व सामाजिक समतेवर आधारलेली आहेत. राज्यघटनेने जरी राजकीय समतेची हमी दिली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यावर समाधान झाले नव्हते. त्यांना अपेक्षित असलेली आर्थिक व सामाजिक समता निर्माण होण्याची गरज आहे, असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. राऊत यांनी केले.

राज्यातील प्रत्येक जिह्यात मागासवर्गीय समाजातून उद्योजक निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी लवकरच एक कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केले जाईल. आतापर्यंतच्या मागासवर्गीय सहकारी संस्थांचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील व भविष्यातील मागासवर्गीय उद्योजकता विकासाचा आराखडा (रोडमॅप) तयार केला जाईल. मागासवर्गीय उद्योजकांना योग्य दर्जाचा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी काय पावले उचलावित याचाही विचार कृती दलातर्फे केला जाईल.

बैठकीला बाबासाहेब आंबेडकर सर्व्हिसेस अँड इंडस्ट्रीज चेंबर्सचे अध्यक्ष अरुण खोब्रागडे, महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे, मराविम सूत्रधार कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्थाच्या महासंघाचे कार्याध्यक्ष मोहन माने, उपाध्यक्ष प्रमोद कदम, सरचिटणीस गौतम गवई व मागासवर्गीय उद्योजक, प्रतिनिधी उपस्थित होते.