Join us  

सौरउर्जेचा प्रकल्प अन्य संस्थांसाठी आदर्श ठरेल- आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:46 AM

सेंटमेरी हायस्कूलच्या प्रकल्पाचे उद्घाटन

मुंबई : काळाची गरज ओळखून सौर उर्जेचा प्रकल्प सुरु करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. गेली अनेक वर्ष शैक्षणिक संस्था केवळ पुस्तकी शिक्षणाच्या चाकोरीबद्धतेत अडकले होते, मात्र सेंटमेरी हायस्कूल (आयसीएसई) या संस्थेसारख्या काही संस्था त्यापलीकडे जाऊन कलागुण आणि गुणवत्तेला प्राधान्य देतात. आता या संस्थेने शैक्षणिक संस्थेपुरते मर्यादित न राहता समाजभान ओळखून सुरु केलेला सौर उर्जेचा प्रकल्प अन्य शैक्षणिक संस्थांसाठी आदर्श ठरेल असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.माझगाव येथील सेंटमेरी हायस्कूलमध्ये बुधवारी सकाळी सौरउर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, सध्याचा काळ असा आहे की, आपण नैसर्गिक साधन संपत्तीकडे परत जायला हवे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी असे पाऊल उचलणे गरजेचे आहे. याप्रसंगी, कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक फादर डॉ. फ्रान्सिस स्वामी, महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते.सौर उर्जेच्या या प्रकल्पाला राज्य शासनाच्या उर्जा विभागाकडून साडे सहा लाखांचे अनुदान मिळाले आहे. या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक मॅक्सवेलचे तांत्रिक संचालक कौस्तुभ आपटे आणि कार्यकारी संचालक आरीफ पेटीवाला आहेत. हा प्रकल्प मॅरीअन गो- ग्रीन संकल्पनेअंतर्गत सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प मोनो क्रिस्टॅलिन सिलिकॉन सेल तंत्रज्ञानावर आधारित आहे. १५६ सोलार मॉड्यूल्स असलेल्या या प्रकल्पाची क्षमता ३५० व्हीपी इतकी आहे. या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, शाळा बंद असताना निर्माण झालेली सौर उर्जा बेस्टच्या नेट मीटर अंतर्गत त्यांना पुरविली जाईल.

टॅग्स :आदित्य ठाकरे