Join us  

दिघाटीत सक्शनद्वारे होतेय वाळू उत्खनन

By admin | Published: June 26, 2015 10:49 PM

पनवेल तालुक्यातील दिघाटी आणि साई गावांच्या मधोमध सध्या रेतीमाफियांनी बस्तान मांडले आहे. अनेक सक्शन पंप लावून येथून रेती उपसा करण्यात येत आहे

चिरनेर : पनवेल तालुक्यातील दिघाटी आणि साई गावांच्या मधोमध सध्या रेतीमाफियांनी बस्तान मांडले आहे. अनेक सक्शन पंप लावून येथून रेती उपसा करण्यात येत आहे. या अनधिकृत रेती उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.स्थानिक शेतकऱ्यांना हाताशी घेऊन या भागातील रेतीमाफिया खाडी किनाऱ्यालगतच्या शेतातील रेती सक्शन पंपाद्वारे उपसा करत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना या बदल्यात ते ठरावीक रक्कम देत आहेत. या चोरीच्या व्यवसायातून चांगला पैसा मिळत असल्याने शेतकरी देखील आपली पिकती शेती सोडून या व्यवसायाकडे वळले आहेत. रेतीमाफियांच्या या रेती उपशामुळे काही शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत असला तरी इतर शेतकऱ्यांची शेती मात्र नापीक होत आहे. अनधिकृत रेती उपशामुळे या भागातील शेती, खाडी किनारे, खारफुटीला मोठा धोका निर्माण झाला असून खाडीचे पाणी शेतजमिनीत घुसण्याचे प्रकार वाढल्याचे येथील शेतकरी सांगतात. शासनाच्या सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन अ‍ॅक्ट) कायद्यानुसार समुद्राच्या भरती रेषेपासून ठरावीक अंतरावर वाळू अथवा दगड उत्खननावर बंदी असताना हे रेतीमाफिया बिनधास्त शासनाच्या कायद्यांना धाब्यावर बसवून रेती उत्खनन करत असतात. असे असून देखील महसूल विभाग आणि पोलीस या रेतीमाफियांकडून फक्त दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडले जाते. या रेतीमाफियांवर सीआरझेडअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. (वार्ताहर)