Join us  

मुंबईत आता सामाजिक सलोखा रॅली, रामदास आठवले करणार रॅलीचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 6:24 PM

कोरेगाव भीमा येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द अधिक भक्कम करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर सामाजिक सलोखा रॅली आयोजित करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसामाजिक सलोखा रॅलीचा प्रारंभ येत्या दि 22 जानेवारीला दुपारी 2 वाजताऔरंगाबादमधील सभा उधळली  नाहीरामदास आठवलेंनी दुय्यम स्थान स्वीकारू नये - सुमंतराव गायकवाड 

मुंबई : कोरेगाव भीमा येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द अधिक भक्कम करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर सामाजिक सलोखा रॅली आयोजित करण्यात येणार आहेत. सामाजिक सलोख्याचे संदेश देणाऱ्या या रॅली मूक रॅली असणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक समतेच, बंधुत्वाचा, एकतेचा संदेश देणाऱ्या या मूक रॅली असतील. रिपाइंच्या सामाजिक सलोखा रॅलीचा प्रारंभ येत्या दि 22 जानेवारीला दुपारी 2 वाजता मुंबईत चैत्यभूमी येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात होणार आहे. सामाजिक सलोखा रॅलीला  चैत्यभूमी येथे सुरुवात होणार असून टिळक ब्रिजमार्गे दादर पूर्व  नायगावच्या स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवण मैदान येथे या रॅलीचे सभेत रूपांतर होणार आहे . असे रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस आविनाश महातेकर यांनी जाहीर केले. भीमछाया संस्कृतिक केंद्र कालिना सांताक्रूझ येथे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रिपाइंच्या बैठकीत  मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

कोरेगाव भीमा येथील आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ  महाराष्ट्र बंद मध्ये उतरलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये.  आंदोलकांवर कलम 307 आणि 395 चे गुन्हे नोंदविलेले गुन्हे अनावश्यक आहेत. अनेक ठिकाणी शंभरहून अधिक लोकांवर कलम 307 सारखे गुन्हे नोंदविणे अन्यायकारक आहेत .त्यामुळे बंद आंदोलनात चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळविणाऱ्या पोलिसांनी अटकेत असलेल्या  आंदोलकांना मारहाण करीत असल्याच्या तक्रारी  काही ठिकाणाहून येत आहेत. आंदोलकांवर अन्यायकारक कारवाई पोलिसांनी करु नये  यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट रिपाइं तर्फे घेण्यात येईल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी यावेळी केले. पोलिसांना आंदोलकांना अटक करण्याचा अधिकार आहे, त्यांना  मारहाण करू नये. महाराष्ट्र बंद मध्ये रिपाइं चे राज्यभर हजारो कार्यकर्ते आंदोलनात होते. कोरेगाव भीमा येथे दगडफेकीत जखमी झालेल्यांना रिपाइं तर्फे तसेच शासनातर्फे मदत  केली जाईल. राज्यात कार्यकर्त्यांवर झालेल्या गुन्हे नोंदीची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांची  रिपाइं शिष्टमंडळातर्फे भेट  घेणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. 

औरंगाबादमधील सभा उधळली  नाही

औरंगाबाद येथे नामांतर वर्धापन दिनी झालेल्या आरपीआयच्या सभेत समतासैनिक दलाचे काही लोक ऐक्याच्या घोषणा देत आले.त्यांच्या दोघा प्रतिनिधींशी स्टेजवर  आपण चर्चा केली . त्यांना आपली रिपब्लिकन ऐक्यासाठी सुरुवातीपासून तयारी आहे. आपली ऐक्यवादी भूमिका असल्याचे कळल्यानंतर  ते सर्व निघून गेले व सभा शांततेत पार पडली. त्यामुळे सभा उधळली हा आरोप पूर्ण खोटा आणि चुकीचा आहे. असे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी केले. रिपब्लिकन ऐक्य भावनिक नको. कायमस्वरूपी टिकणारे ऐक्य व्हावे. मी तर ऐक्याला तयार आहे मात्र प्रकाश आंबेडकर  हेच ऐक्याला तयार नाहीत. जे ऐक्याला विरोध करतात त्यांच्या सभेत घोषणाबाजी झाली पाहिजे असे मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले . यावेळी विचारमंचावर सभाध्यक्ष गौतम सोनवणे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. 

रामदास आठवलेंनी दुय्यम स्थान स्वीकारू नये - सुमंतराव गायकवाड प्रकाश आंबेडकर यांचे स्वतः चे  कर्तृत्व काय आहे असा सवाल करून केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू या पलीकडे त्यांचे स्वतःचे कर्तृत्व काही नाही. त्यामुळे रिपब्लिकन ऐक्य जरुर झाले पाहिजे मात्र त्यात रामदास आठवलेंनी दुय्यम स्थान घेऊ नये, असे स्पष्ट मत रिपाइंचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष  माजी आमदार  सुमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :रामदास आठवले