मुंबईच्या डबेवाल्यांचा समाजशील निर्णय, कोविड सेंटरसाठी देणार धर्मशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 08:04 PM2021-04-19T20:04:28+5:302021-04-19T20:05:37+5:30

मुंबई डबेवाला 130 वर्षापासून मुंबईत घरच्या जेवणाचे डबे शाळा व कार्यालयांमध्ये पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यांच्या कामाची दखल लंडनचा राजा प्रिन्स चार्ल्स यांनी देखील घेतली.

Social decision of Mumbai's Dabewalas, Dharamshala to be given for Kovid Center | मुंबईच्या डबेवाल्यांचा समाजशील निर्णय, कोविड सेंटरसाठी देणार धर्मशाळा

मुंबईच्या डबेवाल्यांचा समाजशील निर्णय, कोविड सेंटरसाठी देणार धर्मशाळा

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या कामाची कार्यशैली, उत्तम व्यवस्थापन धोरणामुळे मुंबईच्या डबेवाल्यांनी संपूर्ण जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच "जनसेवा ही ईश्वर सेवा" आहे.

मुंबई  : कोरोना महामारीने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. गेल्या महिनाभरापासून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरातील वाढत्या रुग्ण संख्येने स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयातही रुग्णांना वेळेत बेड मिळत नसल्याचे चित्र सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. अशातच गेल्या वर्षभरापासून काम धंदा गमावून बसलेले मुंबईचे डबेवाले जनसेवा करण्यासाठी पुढे आले असून त्यांनी आळंदी, पुणे येथील धर्मशाळा कोरोना केअर सेंटरसाठी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसे पत्रच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले आहे. 

मुंबई डबेवाला 130 वर्षापासून मुंबईत घरच्या जेवणाचे डबे शाळा व कार्यालयांमध्ये पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यांच्या कामाची दखल लंडनचा राजा प्रिन्स चार्ल्स यांनी देखील घेतली. कोरोना महामारीमुळे प्रथमच डबेवाल्यांच्या या व्यवसायावर परिणाम झाला. राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला बेड मिळवून देताना सरकार व नातेवाईक या दोघांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. शासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी पर्यंत करीत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये शासनाने उत्तम कामगिरी करून कोरोनाला महाराष्ट्र थैमान घालू दिले नव्हते. परंतु, आता आलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना संक्रमणाचे रुग्ण वाढत आहे. 

आपल्या कामाची कार्यशैली, उत्तम व्यवस्थापन धोरणामुळे मुंबईच्या डबेवाल्यांनी संपूर्ण जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच "जनसेवा ही ईश्वर सेवा" आहे. म्हणून नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून लोकसेवा करीत आलेलो आहोत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून या महामारीच्या संकटात मदत म्हणून डबेवाल्यांच्या आळंदी येथे असणाऱ्या धर्मशाळेचे रुपांतर कोविड रुग्णालयात करण्याचा निर्णय डबेवाले संघटने मार्फत घेण्यात आल्याचे मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते विनोद शेटे यांनी सांगितले. या ठिकाणी जवळपास १०० ते १५० रुग्णांवर उपचार करू शकतो एवढी जागा उपलब्ध आहे. शिवाय इतर प्राथमिक सुविधादेखील इथे उपलब्ध असल्याचेही शेटे यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना रक्ताची गरज असताना मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाचशेहून अधिक रक्त बाटल्या गोळा केल्या होत्या. आत्तादेखील राज्यात बेडची संख्या अपुरी पडत असल्याने सरकारने आमच्या या निर्णयाचा सकारात्मक विचार करुन पुन्हा एकदा जनसेवा करण्याची संधी शासनाने डबेवाल्यांना द्यावी, अशी इच्छा मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी बोलून दाखवली. 

Web Title: Social decision of Mumbai's Dabewalas, Dharamshala to be given for Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.