Join us
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्ते संजय हेगडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST

मुंबई : सेवा सहयोग फाऊंडेशनचे संचालक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय हेगडे यांचे शनिवारी सकाळी महालक्ष्मी येथील ...

मुंबई : सेवा सहयोग फाऊंडेशनचे संचालक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय हेगडे यांचे शनिवारी सकाळी महालक्ष्मी येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. सेवा सहयोग फाउंडेशन सामाजिक संस्थेचे ते संस्थापक-सदस्य होते. २००९ पासून ते सेवा सहयोगचे सक्रिय काम पाहात होते. सेवा सहयोग संपूर्ण महाराष्ट्रात ३०० हून अधिक स्वयंसेवी संस्थांसोबत काम करते. फाउंडेशन वंचित मुलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करत आहे.

संजय हेगडे हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट होते. त्यांचा जन्म आणि शिक्षण मडगाव गोवा येथे झाले. त्यांचे शिक्षण गोव्यातील दामोदर विद्यालय आणि मॉडेल इंग्लिश हायस्कूल येथे झाले. १९७७ मध्ये त्यांना दामोदर कॉलेजने सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थ्याचे पारितोषिक देऊन सन्मानित केले होते. त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती. महाविद्यालयीन जीवनात ते विद्यार्थी मंडळात सक्रिय होते.

संजय हेगडे हे प्राइस वॉटरहाऊस कूपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया येथे ग्लोबल कॅपिटल मार्केट्स ग्रुपचे कार्यकारी संचालक होते. २०११ मध्ये त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एडीआर/जीडीआर मार्गदर्शक तत्त्वांच्या पुनरावलोकनासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीचे ते सदस्य होते.

संजय हेगडे सामाजिक जीवनात सक्रिय होते. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोवेकरांना एकत्र आणून त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देण्यासाठी त्यांनी ‘आमी गोयंकार’ या संस्थेची स्थापना केली. आमी गोयंकार संस्थेने दिवंगत क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या नावाने मरगाव येथे क्रिकेट अकादमी स्थापन करण्यास मदत केली आहे.