...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 05:55 IST2025-12-02T05:54:33+5:302025-12-02T05:55:18+5:30
वायुप्रदूषणप्रकरणी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर अन् हिंदुस्थान कंस्ट्रक्शन या कंत्राटदारांना 'कारणे दाखवा'

...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) बुलेट ट्रेन स्थानक उभारणीवेळी वायुप्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि हिंदुस्थान कंस्ट्रक्शन या कंपन्यांना मुंबई महापालिकेच्या एच ईस्ट वॉर्डने नोटीस बजावली आहे. कंपन्यांनी तीन दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्यास काम थांबवण्याचा इशारा दिला आहे.
पालिकेच्या वायुप्रदूषण नियंत्रण पथकाने जी ब्लॉकमधील बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाच्या प्रकल्पस्थळाची २८ नोव्हेंबरला पाहणी केली होती. त्यावेळी वायुप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नसल्याचे आढळले होते.
त्यामुळे पर्यावरणाला आणि सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. तसेच, यापूर्वी तोंडी सूचना देऊनही प्रदूषण कमी करण्यात बांधकाम कंपन्या अपयशी ठरल्याचे पालिकेच्या नोटिसीत म्हटले आहे.
कंपन्यांना पाठवण्यात आलेली नोटीस पालिकेच्या एच ईस्ट वॉर्डच्या सहायक आयुक्तांनी काढली आहे. तीन दिवसांत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता प्रकल्पाचे काम थांबविले जाईल, असा इशारा नोटिसीत दिला आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
धूळ नियंत्रणासाठी उपाय, प्रशासनाला सहकार्य करू
महापालिकेने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे. बीकेसीतील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकावर धूळ नियंत्रणासाठी हवेची गुणवत्ता मोजणी, मिस्ट गन्स अशा उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या फक्त बेस स्लॅब कास्टिंगचे काम सुरू आहे. बुलेट ट्रेनच्या बांधकामामुळे कोणतेही वायूप्रदूषण होऊ नये, यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांसोबत पूर्ण सहकार्य करू.
-नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि.
बांधकामस्थळी धूळ रोखणे आवश्यक
बांधकामांसाठी लागू केलेल्या २८-बिंदू मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बांधकामस्थळी धूळ रोखण्यासाठी पत्र्याचे कुंपण, हिरव्या जाळ्या, नियमित पाणी फवारणी बंधनकारक करण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या राडारोड्याची शास्त्रोक्त साठवण आणि वाहतूक करण्याचे बंधन आहे. प्रकल्पस्थळी एक्युआय मोजमाप यंत्रणा आणि धूरशोषक यंत्र बसविण्याचे निर्देशही पालिकेने दिले आहेत.
नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ९५ पथके तैनात
मुंबईत सध्या वायुप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेने २५ हून अधिक पथके तैनात केली आहेत. आता वाढते वायुप्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने बडगा उभारला आहे. पालिकेच्या २८ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे विकासकांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांचे उल्लंघन करणारे विकासक, सरकारी आणि खासगी प्रकल्पांचे कंत्राटदार यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला जात आहे.