Join us  

आतापर्यंत दोन नगरसेवकांना खासदारकीचा जॅकपॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 6:19 AM

सेनेचे शेवाळे यांच्यापाठोपाठ भाजपचे कोटक संसदेत

मुंबई : नगरसेवकपदावर काम करताना दिल्लीत पोहोचण्याचे स्वप्न अनेकांना पडते. पण गल्लीतून थेट दिल्लीपर्यंत पोहोचणे फार कमी जणांच्या नशिबात असते. मात्र ही गरूडझेप घेणे आतापर्यंत दोन नगरसेवकांना शक्य झाले आहे. शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक नगरसेवकपदावरून थेट खासदारपदी निवडून आले आहेत.

महापालिका ही राजकीय प्रवासाची पहिली शिडी म्हणून ओळखली जाते. आपल्या प्रभागातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारा नगरसेवक कालांतराने विधानसभा आणि संधी मिळालीच तर लोकसभेत आपले नशीब अजमावत असतो. पण कित्येक वेळा त्या नगरसेवकाचे पक्षातील वजन यावर हे गणित अवलंबून असते. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील नगरसेवकांना थेट लोकसभेचे तिकीट मिळाल्याचेही यापूर्वी दिसून आले आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे तेव्हाचे नगरसेवक व चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष असलेले राहुल शेवाळे यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. दक्षिण मध्य मुंबईतून त्यांनी निवडणूक लढवली आणि मोदी लाटेवर ते निवडूनही आले. या वर्षी दुसऱ्यांदा ते निवडून आले आहेत. भाजपनेही ईशान्य मुंबईतील आपल्या खासदाराचा पत्ता कट करून नगरसेवक कोटक यांना उमेदवारी दिली. सुप्त मोदी लाटेमुळे त्यांनादेखील खासदारपदाचा जॅकपॉट लागला आहे.असा झाला दिल्लीपर्यंतचा प्रवासच्शिवसेनेचे नगरसेवक असलेले राहुल शेवाळे यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेने २०१४ मध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट दिले आणि ती निवडणूक जिंकून नगरसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास सुरू झाला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही दक्षिण मध्य मुंबईतून शेवाळे विजयी झाले होते.च्तर उत्तर पूर्व मुंबईतून भाजपचे किरीट सोमय्या हेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार समजले जात होते. मात्र त्यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेने विरोध केला. त्यानंतर भाजपने आयत्यावेळी मुंबईचे पालिका गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्यासाठी हे निश्चितच अनपेक्षित होते. मात्र, मिळालेल्या संधीचा फायदा घेत मनोज कोटक यांनी बाजी मारत उत्तर पूर्व मुंबईची ही जागा जिंकली.