Join us  

स्मार्ट सिटीच्या कागदावरील आणि अर्धवट प्रकल्पांला अखेर लागणार ब्रेक,स्मार्टसिटीच्या बैठकीत शासनाच्या प्रतिनिधींनी केल्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:33 PM

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या स्मार्टसिटीच्या विविध प्रकल्पांना आता ब्रेक लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शुक्रवारी झालेल्या स्मार्टसिटीच्या बैठकीत स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या परंतु जे प्रकल्प कागदावर आहेत, ज्यांची कामे अधर्वट आहेत, अशा प्रकल्पांचा निधी शहरातील इतर कामांसाठी वर्ग करण्याच्या दृष्टीने एकमत झाले आहे.

ठाणे : स्मार्टसिटीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प ठाणे शहरात सुरु आहेत. परंतु काही प्रकल्प हे अर्धवट आहेत, काही प्रकल्प विविध स्वरुपाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत, तर कही प्रकल्पांसाठी निधीची केवळ तरतूद केली असून त्यांची कामे मात्र सुरु झालेली नाहीत. त्यामुळे अशा प्रकल्पांचा निधी शहरातील इतर तातडीच्या आणि महत्वाच्या कामांसाठी वळता करावा अशा सुचना महापौर नरेश म्हस्के यांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत दिल्या. त्या अनुषंगाने शासनाचे प्रतिनिधी मनुकुमार श्रीवास्तव ायंनी देखील त्यानुसार याचा अभ्यास करुन स्मार्टसिटीकडे पत्रव्यवहार करुन हा निधी इतर कामांसाठी वळता करता येऊ शकतो का? याची माहिती पुढील बैठकीत द्यावी असे आदेश ठाणे महापालिकेला दिले आहेत.                 स्मार्टसिटीच्या मागील महिन्यात झालेल्या बैठकीत देखील महापौर म्हस्के यांनी लाल पिवळा रंग फुटपाथला दिला म्हणजे स्मार्ट सिटी होत नसल्याचे सांगत प्रशासनावर आगपाखड केली होती. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या बैठकीत देखील त्यांनी पुन्हा याच मुद्याला हात घातला. मागील कित्येक वर्ष स्मार्टसिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्पांचे कामे शहरात सुरु आहेत. परंतु यातील एकही काम आजतागायत पूर्ण झालेले नाही, अनेक कामांसाठी अद्याप विविध परवानगीची गरज बाकी आहे, काही प्रकल्प कात्रीत सापडले आहेत, तर काही प्रकल्पांची कामे दोन ते तीन वर्षापासून केवळ ५ ते १० टक्केच झाली आहेत. तर काही कामांना केवळ निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु कामे काही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे स्मार्टसिटीमध्ये प्रत्यक्षात कामे होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. सौर उर्जेचा प्रकल्प उभारण्यात आला, त्याचा पालिकेला काय फायदा झाला, कितीची बचत झाली, याचा कधी आपण विचार केला आहे का?, वॉटर फ्रन्ट प्रकल्पाची कामे अर्धवट स्थितीत आहेत, कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर आदींसह इतर प्रकल्पांची अवस्थाही जैसे थे अशीच आहे, फ्री वायफाय सुरु आहे का?, पाण्याचे मीटर लावले, ते चांगले आहेत का?, त्याची निगा देखभाल कोण करणार, त्यावर कंट्रोल कोणाचे आहे?, याची माहिती घेतली गेली का? असे अनेक सवाल उपस्थित करीत स्मार्टसिटीच्या प्रकल्पांवर त्यांनी पुन्हा एकदा आक्षेप नोंदविला.           दरम्यान कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यात स्मार्टसिटीत असे अनेक प्रकल्प आहेत, ज्यांचा सध्या ठाणे शहराला गरज नाही. असे प्रकल्प थांबवून त्या कामाचा निधी महापालिकेचे रस्ते, पाण्याच्या टाकी, पाणी योजना अशा विविध प्रकल्पांसाठी स्मार्टसिटीचा निधी देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. त्यावर शासनाचे प्रतिनिधी मनुकुमार श्रीवास्तव यांनी देखील महापौरांनी मांडलेले मुद्दे रास्त असून त्यानुसार पुढील बैठकीत स्मार्टसिटीच्या प्रकल्पांचा आढावा देण्यात यावा, कोणत्या प्रकल्पाची कामे कीती झाली, कोणते प्रकल्प कागदावर आहेत, निधीची तरतूद किती प्रकल्पांसाठी केली आहे, याची सविस्तर माहिती द्यावी अशा सुचना त्यांनी केल्या. त्यानंतर या संदर्भात स्मार्टसिटीला पत्रव्यवहार करुन यातील प्रकल्पांच्या कामांचा निधी इतर कामांसाठी वळता करण्याची परवानगी घ्यावी अशी सुचनाही त्यांनी केली असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. त्यामुळे आता स्मार्टसिटीच्या कागदावर असलेल्या प्रकल्पांला ब्रेक लागणार असल्याचेच दिसत आहे. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकास्मार्ट सिटी