Join us  

चाळीतील भांडणामुळे छोटी बाग हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 2:14 AM

तक्रारीची दखल घेत कारवाई : महापालिका पुन्हा बाग उभी करणार

मुंबई :दादर येथील शंकर घाणेकर रोडजवळील जोगेश्वरी वाडी येथे मोरे कुटुंबीयांनी एक छोटीशी बाग उभी केली होती. परंतु, चाळीतील नागरिकांनी महापालिका जी/उत्तर विभागाकडे या बागेची अडचण होत असल्यामुळे, तसेच पाण्यामुळे दुर्गंधी पसरू लागल्याची तक्रार केली. या तक्रारीवरून महापालिकेने बाग हटविली. तसेच ही बाग पदपथापर्यंत पसरली होती. त्यामुळे बागेला हटविणे गरजेचे होते. परंतु पदपथाच्या बाजूला थोडीशी जागा रिकामी असून तिथे महापालिका झाडांच्या कुंड्या ठेवणार असल्याचे महापालिकेच्या जी/उत्तर विभागाने सांगितले.

सिद्धिविनायक येथे रात्रीच्या वेळी दर्शनासाठी येणारी मंडळी या ठिकाणी लघुशंका करण्यासाठी त्या जागेचा वापर करीत होती. त्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली होती. तसेच या जागेचा वापर अडगळ व कचरा टाकण्यासाठी केला जायचा. प्रथमत: ती जागा स्वच्छ करून घेतली. कचरा टाकला जाऊ नये, यासाठी झाडांच्या कुंड्या ठेवल्या. सोनचाफा, पांढरा चाफा, हिरवा चाफा, नागचाफा, सेहरा, पेट्रीया, रुद्र्राक्ष, कवठी चाफा, काळा बांबू, कामिनी, बोगनवेल अशी झाडे बहरू लागली होती, अशी माहिती मन्नत मोरे यांनी दिली.

काही दिवसांनी तो कोपरा अत्यंत सुशोभित दिसू लागला. विविध पक्षी, फुलपाखरे बागडू लागली. पाखरांना अधिवास उपलब्ध व्हावा, म्हणून सुगरणीची घरटी जवळच्या झाडांवर टांगून ठेवण्यात आली. पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही, अशा तºहेने शेजारच्या इमारतीच्या कुंपणाबाहेर व पदपथाच्या कडेने अनेक सुंदर फुले, फळझाडांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. परंतु, काही लोकांनी पदपथावर चालण्यास अडचण होते, अशी खोटी तक्रार केली. त्यानंतर महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता, २० ते २५ वर्षांपासून प्रेमाने जोपासलेली एक सुंदर बाग उद्ध्वस्त केली, असेही मोरे म्हणाले.

सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला एक चाळ आहे. तिथे मोरे कुटुंबीयांनी पदपथावर झाडे लावली होती. ते कुटुंब ती बाग आहे असे सांगून झाडांना दररोज पाणी देत असे. झाडांना पाणी देताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल होत असे. त्यामुळे तिथे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली होती. तेव्हा चाळीतील रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार केली. तक्रारीनंतर घटनास्थळी जाऊन बागेला भेट दिली असता रहिवाशांचे जागेवरून वादविवाद सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी ही जागा कोणाचीही नसून ती महापालिकेची आहे, असे सांगून वाद मिटविण्यात आला. त्यामुळे तेथील झाडांच्या कुंड्या उचलून महापालिकेच्या बागेत ठेवण्यात आल्या. आता पदपथावरून अतिक्रमण हटवून उर्वरित जागेवर झाडांच्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत.- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी/उत्तर विभाग, महापालिका.