नवी मुंबई : गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सुरू केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हजारो प्रकल्पग्रस्तांनी सिडकोवर धडक दिली. कारवाई तत्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी ८ तास ठिय्या आंदोलन केले. संतप्त आंदोलकांनी सिडको हटावचा नारा देऊन शहरातील सर्व कामे थांबविण्याचा इशारा दिला आहे. सिडकोमध्ये घुसण्याचा इशारा दिल्यामुळे दिवसभर परिसरात तणावाचे वातावरण होते. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरांतील अनधिकृत बांधकामांवर सिडकोने धडक मोहीम सुरू केली आहे. गरजेपोटी बांधलेल्या घरांवरही बुलडोझर फिरविला जात आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कारवाईचा निषेध करण्यासाठी दि. बा. पाटील निर्धार मोर्चाचे आयोजन केले होते. नवी मुंबईमधील २८ गावे व पनवेल, उरणमधील शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. किल्ले गावठाणपासून १० हजारपेक्षा जास्त आंदोलक सहभागी झाले होते. सर्वच प्रकल्पग्रस्त नेत्यांनी सिडकोच्या कारवाईचा निषेध केला. कारवाई थांबविण्याचे आश्वासन देईपर्यंत नेत्यांनी व्यासपीठावरून जाऊ नये व आंदोलकांनी जागा सोडू नये, असे आवाहन करण्यात आले. सर्वच नेत्यांनी सिडकोचा समाचार घेतला. (प्रतिनिधी)नवी मुंबई बेमुदत बंद करणारबुधवारच्या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचे आश्वासन दिले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.सिडकोची कामे थांबविण्याबरोबर बेमुदत नवी मुंबई बंद करण्याचा इशारा दिला आहे. वेळ पडली तर सर्व महामार्ग रोखण्यात येणार आहेत.