Join us

कोळशाच्या उत्पादनासाठी महाडमध्ये झाडांची कत्तल

By admin | Updated: March 30, 2015 22:24 IST

कोळशाच्या उत्पादनाला पूर्णपणे बंदी असताना महाड तालुक्यात मात्र राजरोस कोळसा उत्पादन होत आहे. झाडांची बेकायदेशीर कत्तल करून कोळसा

महाड : कोळशाच्या उत्पादनाला पूर्णपणे बंदी असताना महाड तालुक्यात मात्र राजरोस कोळसा उत्पादन होत आहे. झाडांची बेकायदेशीर कत्तल करून कोळसा उत्पादनामध्ये देखील हा तालुका अग्रक्रमांवर गेला आहे. वन विभागाकडून याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. गेल्या अनेक वर्षापासून झाडांची मोठया प्रमाणांत कत्तल केली जात असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते. शासन धोरणाप्रमाणे वृक्ष लागवडीचे कार्यक्रम या विभागामार्फत केले जातात परंतु किती वृक्षांची लागवड करण्यात आली त्यातील किती वृक्ष जिवंत आहेत याची नोंद या विभागाकडे नाही. तालुक्यातील बिरवाडी नाते हे जिल्हा परिषदेचे दोन मतदार संघ कोळसा उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या परिसरातून मोठयाप्रमाणात कोळसा उत्पादनासाठी झाडे तोडली जातात. भावे पठार, पिंपळवाडी, निगडे, मोहोत, बारसगाव, तळीचे, वरंध, माझेरी, पडवी, पठार, शिवथर तसेच नाते, कोंझर परिसरातील कोतुर्डे, नेराव, खर्डी, नगरभूवन, नांदगाव, कोंडरान, सांदोशी, सारवट, कावळे, बावले, पुनाडे या गावाच्या परिसरातून कोळसा उत्पादन करणाऱ्या भट्ट्या सर्वत्र दिसून येतात. दिवसा दुर्गम भागांमध्ये कोळसा तयार केला जातो आणि रात्रीच्या वेळी महाड पोलादपूर तालुक्यातील हॉटेल व्यवसायिकांपर्यंत पोहोचविला जातो. वन विभागाकडून याप्रकरणी साधी चौकशी देखील केली जात नसल्याने या विभागाचे कोळसा उत्पादकाशी आर्थिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातो. याविषयी महाड वनक्षेत्रपाल पाथरडीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोळसा ग्रामीण भागात तयार केला जात असल्याचा दुजोरा दिला परंतु कारवाई करणेबाबत मौन पाळले. बिरवाडी विभागात गेल्या अनेक वर्षापासून जंगलातील झाडांची कत्तल करणे त्याचप्रमाणे जंगली झाडांपासून बेकायदेशीर कोळसा उत्पादन करणे हा उघडपणे चालविण्यात येत असलेला बेकायदेशीर धंद्यांच्या विरोधात महाड येथील वनविभाग कारवाई का करीत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लाकडांची तस्करी व बेकायदेशीर कोळशाचा उद्योग उघडपणे परिसरात सुरू असल्याचे सांगण्यात आले.