Join us  

चिंचणी खाडी नाकामध्ये गायींची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:07 AM

पालघर : डहाणू तालुक्यातील चिंचणी खाडीनाका येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही गायींची कत्तल झाल्याचे उघडकीस झाल्याने चिंचणी-तारापूर भागात तणावाचे ...

पालघर : डहाणू तालुक्यातील चिंचणी खाडीनाका येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही गायींची कत्तल झाल्याचे उघडकीस झाल्याने चिंचणी-तारापूर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात सहा आरोपींवर गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना चिंचणी खाडीनाका येथे एका अवैधपणे चालवल्या जाणाऱ्या कत्तलखान्यात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गाई आणण्यात आल्याची खबर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर मध्यरात्री वाणगाव पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या येण्याअगोदरच काही गुरांची कत्तल करण्यात आली होती, तर या ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेल्या १३ गाईंना ताब्यात घेऊन त्यांची विश्व हिंदू परिषद-बजरंग दल संचालित बोईसर येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.

गोवंशाची कत्तल झालेल्या जागेवरून पोलिसांनी रक्तमिश्रित काही अवयवांचे भाग जप्त करून ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. गायींची हत्या झाल्याचा प्रकार चिंचणीमध्ये घडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच चिंचणी खाडी नाका पोलीस चौकीजवळ काही लोक जमा झाले होते. या घटनेमुळे अधिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क आहे. याआधी ऑगस्ट २०१९ मध्येदेखील तारापूरमध्ये गोवंश कत्तलीचा प्रकार घडला होता.