Join us  

सहा वाहने उडवली

By admin | Published: February 08, 2015 1:53 AM

पुण्याच्या संतोष मानेची पुनरावृत्ती शुक्रवारी मध्यरात्री भांडुप ते विटाव्यादरम्यान होता होता राहिली.

मुंबई : पुण्याच्या संतोष मानेची पुनरावृत्ती शुक्रवारी मध्यरात्री भांडुप ते विटाव्यादरम्यान होता होता राहिली. एका खासगी बसचालकाने दारूच्या नशेत या प्रवासात पोलिसांच्या व्हॅनसह पाच ते सहा वाहनांना धडक देत रस्त्यावरून सैरावैरा बस हाकली. सुदैवाने या धोकादायक प्रवासात कोणतीही जीवित हानी झाली नाही. सुमारे दीडेक तासांच्या पाठलागानंतर भांडुप पोलिसांनी ही बस विटाव्याला कशीबशी रोखून दारुड्या चालकाच्या मुसक्या आवळल्या.रामस्वरूप किशनलाल यादव (२७) असे या तळीराम चालकाचे नाव आहे. यादव मूळचा मध्य प्रदेशचा. सहा महिन्यांपूर्वीच मुंबईत आलेला. ऐरोलीतील एका टुरीस्ट कंपनीत चालक म्हणून तो काम करतो. बसमधून कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यांना सोडण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. मुंबईत घर नसल्याने ऐरोली परिसरात बस पार्क करून त्यातच झोपणे हा त्याचा नित्यक्रम. मात्र शनिवारी सुट्टी असल्याने काल रात्री ११च्या सुमारास तो कांजूरमार्ग, गांधीनगर परिसरातल्या एका बारमध्ये दारू प्यायला. एका ठिकाणी बस पार्क करतेवेळी एका बाईकस्वाराला धडक बसली. तो बाईकस्वार मारहाण करेल या भीतीने तो तेथून सुसाट सुटला. मध्यरात्री २च्या सुमारास भांडुप ड्रीम्स मॉलजवळ त्याने विरोधी मार्गिकेवर बस घातली. त्याचवेळी भांडुप पोलिसांची व्हॅन गस्तीवर होती. व्हॅनमधील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पंडित आणि पथकाने उलट्या दिशेला बस पाहून ती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहून यादवने बसचा वेग वाढवला आणि मुलुंडच्या दिशेने सुसाट सुटला.हा प्रकार पाहून एपीआय पंडित आणि पथकाने बसचा पाठलाग सुरू केला. एलबीएस मार्गावरील शांग्रीला कंपनीजवळ व्हॅनने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र यादवने व्हॅनला धडक देत बाजूला सारले आणि दुप्पट वेगाने बस हाकली. पोलिसांनी पुन्हा बसचा पाठलाग सुरू केला. सोनापूर चौकात यादवने वेगात उजवीकडे वळण घेत जोडमार्गाने ऐरोलीच्या दिशेने बस सोडली. त्या प्रयत्नात त्याने एका स्वीफ्ट गाडीला धडक दिली. ऐरोली टोलनाक्यावर पोहोचताच यादवने तेथे टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या चार वाहनांना धडक देत टोलनाका ओलांडला. पुढे विटावा परिसरात यादवच्या बसला ओव्हरटेक करून पंडित आणि पथकाने बस रोखली. यादवच्या मुसक्या आवळून त्याला मध्यरात्री ३च्या सुमारास पोलीस ठाण्यात आणले गेले. (प्रतिनिधी)या थरारनाट्यात एकदा कसेबसे बचावलो. एकीकडे पाठलाग सुरू होता तर दुसरीकडे नियंत्रण कक्षाशी बोलणे सुरू होते. बस ज्या पद्धतीने रस्त्यावरून सैरावैरा धावत होती ते पाहून जीवित हानी होईल असे वाटत होते. मात्र जीवितहानी टाळण्याची धडपड आमचे पथक करीत होते. या थरारक पाठलागात कोणतीही जीवितहानी झाली नाही याचेच समाधान आहे. - एपीआय सुधीर पंडित, भांडुप पोलीस ठाणे