Join us  

सहा दुर्मीळ कासवे दगावली

By admin | Published: March 31, 2016 2:22 AM

मुंबई विमानतळावर २० मार्चला तस्कराकडून हस्तगत करण्यात आलेली एकूण १४३ कासवे संवर्धनासाठी २२ मार्चला कर्नाळा अभयारण्यात ठेवण्यात आली होती. आफ्रिका खंडातील एका

- वैभव गायकर,  पनवेलमुंबई विमानतळावर २० मार्चला तस्कराकडून हस्तगत करण्यात आलेली एकूण १४३ कासवे संवर्धनासाठी २२ मार्चला कर्नाळा अभयारण्यात ठेवण्यात आली होती. आफ्रिका खंडातील एका बेटावरून ही कासवे मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आली होती. या कासवांची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. कर्नाळा अभयारण्यात ठेवण्यात आल्यानंतर या दुर्मीळ जातीच्या कासवांपैकी सहा कासवे दगावली आहेत. अ‍ॅनिमियामुळे या कासवांचा मृत्यू झाला असून वनविभागानेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबई विमानतळावर कासवांची तस्करी करणारी टोळी पकडण्यात आली होती. त्यांच्याकडून हस्तगत केलेली १४३ वेगवेगळ्या दुर्मीळ प्रजातीची कासवे आफ्रिका खंडातील मादागास्कर बेटावरून मुंबईत आणण्यात आली होती. कासवाला घरात अथवा कार्यालयात ठेवल्यास धनसंपत्ती प्राप्त होते, असा मानस असल्यामुळे काही जण यासाठी कोट्यवधी रुपये मोजण्यास तयार असतात. दुर्मीळ जातीच्या या कासवांना भारतात मोठी मागणी असल्यामुळे ही कासवे या ठिकाणी आणली गेली. नवी मुंबईतील वन्य जीव नियंत्रण ब्युरो (पश्चिम क्षेत्र) यांनी ती सर्व कासवे संवर्धनासाठी कर्नाळा अभयारण्यातील वनविभागाकडे २२ मार्चला सोपविली. मात्र यापैकी सहा कासवे दगावली. वातावरणातील बदल अथवा उष्माघातामुळे कासवांना जीव गमवावा लागला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी कासवांचा हा मृत्यू अ‍ॅनिमियामुळे झाला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल एस.के. पवार यांनी दिली. पाच कासवे काही दिवसांपूर्वी दगावली होती. यापैकी सहावे कासव बुधवारी दगावले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकूण १४३ पैकी १३७ कासवे या ठिकाणी शिल्लक आहेत. उर्वरित सर्व कासव चांगल्या स्थितीत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.