Join us  

मनसेचे ते सहा नगरसेवक महापालिकेत परतले; शिवसेनेत दाखल झाल्यावर दिल्या घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:30 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कारभाराला कंटाळून पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत दाखल झालेल्या सहाही नगरसेवकांनी गुरुवारी मुंबई महापालिका सभागृहाच्या कामकाजाला उपस्थिती दर्शविली; आणि शिवसेनेने या सहा नगरसेवकांसोबत भगवे फेटे बांधत, पेढे वाटत सभागृह परिसरात आनंदोत्सव साजरा केला.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कारभाराला कंटाळून पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत दाखल झालेल्या सहाही नगरसेवकांनी गुरुवारी मुंबई महापालिका सभागृहाच्या कामकाजाला उपस्थिती दर्शविली; आणि शिवसेनेने या सहा नगरसेवकांसोबत भगवे फेटे बांधत, पेढे वाटत सभागृह परिसरात आनंदोत्सव साजरा केला. शिवाय ‘आवाज कुणाचा..? शिवसेनेचा!’, आणि ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो!’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.मुंबई महापालिकेत कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना - भाजपामध्ये वाद रंगत असतानाच पालिकेतील आपापले संख्याबळ वाढावे म्हणून सेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. नगरसेवकांच्या ‘पळवापळवी’चे राजकारण सुरू असतानाच शिवसेनेने भाजपाला शह देत मनसेच्या सहा नगरसेवकांना फोडले; आणि आपले पारडे जड केले. मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्या विलीनीकरणाला मान्यता प्राप्त झाली नव्हती. सेना आणि मनसेमधला संघर्ष वाढत असतानाच हे प्रकरण कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल झाले.कोकण विभागीय आयुक्तांनी महापालिकेतील मनसेच्या सहा नगरसेवकांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला मान्यता दिली; आणि महापौरांनीही त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. दरम्यानच्या काळातील या सर्व घडामोडीनंतर गुरुवारी महापालिकेच्या सभागृह कामकाजासाठी मनसेच्या या सहाही नगरसेवकांनी हजेरी लावली; आणि सदस्यसंख्या वाढल्याने शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करीत आनंद साजरा केला. ढोलताशाच्या आवाजात शिवसेनेचे सर्व सदस्य भगवे फेटे बांधून सभागृहात उपस्थित झाले होते.- मनसेचे गटनेते दिलीप लांडे, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेगावकर, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर या मनसेच्या सहा नगरसेवकांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत प्रवेश केला होता.- पक्षातील कारभाराला कंटाळून पक्ष सोडल्याचे कारण सहा नगरसेवकांनी पुढे केले होते; शिवाय शिवसेनेत सहभागी होण्यासाठी कोकण आयुक्तांना पत्रदिले होते. परंतुमनसेने यावर आक्षेप घेतला होता.- कोकण विभागीय आयुक्तांनी यावर आपला निकाल देत यासंदर्भातील अभिप्राय महापौरांना दिले होते. यावर महापौरांनी सहाही नगरसेवकांच्या विलीनीकरणाची घोषणा गत सभागृहात केली होती.- गुरुवारी त्यानंतर पहिले सभागृह भरले असतानाच हे नगरसेवक भगवे फेटे बांधून येथे दाखल झाले. शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी सहा नगरसेवकांसोबत सभागृहात प्रवेश केला. ‘आवाज कुणाचा..? शिवसेनेचा!’, आणि ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो!’अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई