Join us

वर्क फ्राॅम होममध्ये तासन्‌तास बसून राहणे घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:06 IST

मुंबई - सलग बरेच तास बसून राहिल्‍याने उच्‍च रक्‍तदाब होऊ शकतो आणि कार्डियोव्‍हॅस्‍क्युलर आजार व कर्करोगामुळे मृत्‍यू होण्‍याचा धोका ...

मुंबई - सलग बरेच तास बसून राहिल्‍याने उच्‍च रक्‍तदाब होऊ शकतो आणि कार्डियोव्‍हॅस्‍क्युलर आजार व कर्करोगामुळे मृत्‍यू होण्‍याचा धोका वाढू शकतो? डेस्‍कसमोर, दुचाकीवर किंवा स्क्रिनसमोर अशा कोणत्‍याही स्थितीमध्‍ये तासन्‌तास बसून राहणे घातक ठरू शकते, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

आपण बसतो तेव्‍हा उभे राहणे किंवा चालण्‍याच्या तुलनेत कमी ऊर्जेचा वापर करतो. संशोधनातून निदर्शनास आले आहे की, बरेच तास बसून राहिल्‍याने विविध आरोग्‍यविषयक आजार होतात. यामध्‍ये लठ्ठपणासह इतर आजार जसे हाय ब्‍लड शुगर, कमरेच्‍या भोवती जादा चरबी आणि असामान्‍य कोलेस्‍ट्रॉल पातळ्या यांचा त्रास होतो. बरेच तास बसून राहिल्‍यामुळे कार्डियोव्‍हॅस्‍क्युलर आजार व कर्करोगामुळे मृत्‍यू होण्‍याचा धोका देखील वाढतो.

बरेच तास बसून राहणे व आरोग्‍यविषयक आजारांचा धोका यामधील संबंध समजून घेण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या विविध अभ्‍यासांमधून निदर्शनास आले की, कोणत्‍याही शारीरिक हालचालींशिवाय दिवसातून आठ तासांपेक्षा अधिक काळ बसून राहणाऱ्या व्‍यक्‍तींना लठ्ठपणा किंवा धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्‍यूचा धोका समान होता. म्‍हणूनच बैठेकाम करण्‍याची जीवनशैली तुमच्‍या आरोग्‍यासाठी घातक ठरू शकते. दिवसादरम्‍यान कमी वेळ बसणे किंवा काम करताना काही वेळ उताणी पडणे अशा गोष्‍टींमुळे जीवन आरोग्‍यदायी राहू शकते.

हालचाल किंवा रमतगमत केलेल्‍या हालचालीचा परिणाम देखील उत्तम ठरू शकतो. ही सुरुवात केल्‍यास तुमच्‍या शरीरातील अधिक कॅलरीज निघून जातील. ज्‍यामुळे वजन कमी होऊन ऊर्जा पातळ्या वाढू शकतात. तसेच शारीरिक व्‍यायामामुळे स्‍नायूंची शक्‍ती कायम राखण्‍यामध्‍ये मदत होते, परिणामत: मानसिक आरोग्य उत्तम राहते, अशी माहिती इंटरवेन्‍शनल कार्डियोलॉजी डॉ. विवेक महाजन यांनी दिली आहे.

कामकाजाच्‍या वेळी सक्रिय व आरोग्‍यदायी कसे राहावे?

तुम्‍ही शारीरिकदृष्‍ट्या सक्रिय आहात तर तुमच्‍यामधील ऊर्जा पातळ्या व सहनशक्‍ती सुधारते आणि हाडे बळकट राहतात. शक्‍य असेल तर काही वेळ उभे राहा किंवा काम करताना चालण्‍याचा प्रयत्‍न करा.

- दर ३० मिनिटांनी बसण्‍याच्‍या स्थितीमधून काहीसा ब्रेक घ्‍या.

-फोनवर बोलताना किंवा टेलिव्हिजन पाहताना उभे राहा.

- डेस्‍कवर काम करत असाल तर स्‍टॅण्डिंग डेस्‍क निवडा किंवा उंच टेबल किंवा काऊंटरसह सुधारणा करा.

- तुमच्‍या कामाचे साहित्‍य ट्रेडमिलवर ठेवा जसे कॉम्‍प्‍युटर स्क्रिन व कीबोर्ड स्‍टॅण्‍डवर किंवा विशेषीकृत ट्रेडमिल-रेडी व्‍हर्टिकल डेस्‍कवर ठेवा, ज्‍यामुळे तुम्‍हाला दिवसभर हालचाल करता येऊ शकते.