Join us  

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न साकार होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 3:17 AM

महापालिकेतील विरोधी पक्ष आणि पहारेक-यांना गाफील ठेवून, गच्चीवर रेस्टॉरंटचे धोरण अंमलात आणण्यात यशस्वी ठरलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : महापालिकेतील विरोधी पक्ष आणि पहारेक-यांना गाफील ठेवून, गच्चीवर रेस्टॉरंटचे धोरण अंमलात आणण्यात यशस्वी ठरलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत. वांद्रे येथील कार्टर रोड समुद्र कट्टा (प्रोमोनेड)नजीकच्या जॉगर्स पार्कशी जोडण्याचा त्यांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. मुंबईतील ही दोन प्रमुख स्थळे या मार्गाच्या माध्यमातून जोडल्यास प्रभात फेरी व जॉगिंगसाठी येणाºयांचा आनंद द्विगुणित होणार आहे. प्रोमोनेडच्या विस्ताराची मूळ संकल्पना ए. जे. आर्किटेक्ट या कंपनीची आहे.

मुंबईकरच नव्हे, तर बॉलीवूडमध्येही कार्टर रोड व जॉगर्स पार्क ही दोन स्थळे लोकप्रिय आहेत. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. २००३ मध्ये सुभाष घई यांनी ‘जॉगर्स पार्क’ या नावानेच चित्रपट काढला होता. त्याचे चित्रीकरण या पार्कमध्येच झाले. वांद्रे पाली हिल, कार्टर रोड परिसरात अनेक सेलिब्रिटी राहतात. त्यामुळे या जॉगर्स पार्कमध्ये या मंडळींची दररोज हजेरी असते.प्रभात फेरीसाठी बरेच स्थानिक वांद्रेकर येथे येत असतात. त्यामुळे हा जॉगिंग ट्रॅक वाढविण्याची मागणी होत होती.

कार्टर रोडचा प्रोमोनेड १.६ कि.मी. आहे. या प्रोमोनेडपासून जॉगर्स पार्क १० मिनिटांवर आहे. त्यामुळे ५५० मीटरचा विस्तार या ठिकाणी केल्यास, ही दोन प्रमुख स्थळे जोडली जातील, असा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाकडे मांडला आहे. या मार्गामुळे पादचारी, जॉगर्स आणि पर्यटकांसाठी २.२ किमीचा पट्टा खुला होईल, असे ठाकरे यांनी आपल्या प्रस्तावातून सुचविले आहे. हा प्रस्ताव महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त अजय मेहता यांच्या पटलावर आहे.जॉगिंगचा पट्टा होणार २.२ किमीवांद्रे रेसिडेन्ट असोसिएशनमार्फत कार्टर रोड प्रोमोनेडची देखभाल करण्यात येते.कार्टर रोडचा प्रोमोनेड १.६ किमी. आहे. जॉगिंग पार्कशी जोडल्यास हा पट्टा २.२ किमीचा होईल.प्रभात फेरी व जॉगर्ससह पर्यटकांचाही आनंद द्विगुणित होणार.

टॅग्स :आदित्य ठाकरे