Join us

श्रीरामाचे नाव कोणावरही थोपविलेले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणारसचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कलखनऊ : पश्चिम बंगालमधील आगामी ...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

लखनऊ : पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामधील शाब्दिक संघर्ष टोकाला गेला असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अप्रत्यक्षरीत्या तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. आम्ही रामाचे नाव कोणावरही थोपविलेले नाही. थोपविणारही नाही, असे ते म्हणाले. भाजपवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेश दिनानिमित्त लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी मुंबई, दिल्ली आणि कोलकातास्थित पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कित्येक वर्षांपासून सुरू असलेला अयोध्या वाद संपला आहे. अयोध्या बदलत आहे. उत्तर प्रदेश बदलत आहे. पायाभूत सेवा सुविधा विकसित होत आहेत. आम्ही पूर्वांचल एक्स्प्रेस हायवेसारखा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. एकूण चार एक्स्प्रेस हायवे बांधले जात आहेत. यामुळे येथे औद्योगिक क्षेत्र विकसित होईल.

व्यापार आणि रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. छोटी, मोठी अशा दोन्ही गुंतवणूक करण्यासाठी आम्ही गुंतवणूकदारांना प्राेत्साहित करत आहोत. स्थानीय गुंतवणूक तसेच परदेशी गुंतवणूक व्हावी म्हणून काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे. आम्ही चार वर्षे वादाशिवाय पूर्ण केली. केंद्र आणि राज्याच्या योजना लोकांपर्यंत पाेहाेचत आहेत. दारूमुक्त उत्तर प्रदेशसाठी, शेतकरी प्रश्न सोडण्यासाठी काम करत आहोत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधील नागरिकांना येथे रोजगार मिळावा म्हणून काम केले जात असून, येथील ७५ जिल्ह्यांतून ७५ प्रकारच्या उत्त्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी उत्तर प्रदेश दिनासह विविध कार्यक्रमातून प्रयत्न केले जात आहेत. येथील पर्यटन आणि मंदिरांसह लगतच्या परिसरातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यावर उत्तर प्रदेश प्रशासन भर देत असल्याचे यावेळी प्रशासनाने नमूद केले.

* अशा काही पायाभूत सेवांचा वेगाने विकास

पूर्वांचल एक्स्प्रेस वे (ग्रीन फिल्ड), बुंदेलखंड एक्स्प्रेस वे ( ग्रीन फिल्ड), गोरखपूर लिंक एक्स्प्रेस वे (ग्रीन फिल्ड), गंगा एक्स्प्रेस परियोजना