Join us  

गोळीबाराचा डाव उधळला; सुरेश पुजारीच्या ५ हस्तकांना बेड्या, गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 3:11 AM

भिवंडीनंतर फोर्टमधील व्यावसायिकावर खंडणीसाठी गोळीबाराच्या तयारीत असलेल्या गँगस्टर सुरेश पुजारी टोळीचा डाव उधळण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. शनिवारी दादर परिसरातून सुरेश पुजारीच्या ५ हस्तकांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : भिवंडीनंतर फोर्टमधील व्यावसायिकावर खंडणीसाठी गोळीबाराच्या तयारीत असलेल्या गँगस्टर सुरेश पुजारी टोळीचा डाव उधळण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. शनिवारी दादर परिसरातून सुरेश पुजारीच्या ५ हस्तकांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.हरिश कोटीयन (३०), संकेत दळवी (२५), प्रथमेश कदम (२२), नूरमहम्मद खान (२५) आणि अनिकेत ठाकूर (२८) अशी अटक हस्तकांची नावे आहेत. कोटीयन आणि दळवी कल्यण, डोंबिवलीतील रहिवासी आहेत. उल्हासनगर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार व्यावसायिकाचा फोर्ट परिसरात कॅमेरा विक्रीचा व्यवसाय आहे. ६ जानेवारीपासून सुरेश पुजारीच्या नावाने ५० लाखांच्या खंडणीसाठीचे फोन सुरू झाले. त्यांनी थेट गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.याच दरम्यान, पुजारी टोळीच्या शूटर्सनी भिवंडीतील आर. एन. पार्क हॉटेलवर गोळीबार केला. यामध्ये रिसेप्शनिस्ट जखमी झाली. या घटनेचा संदर्भ देत, पुजारी टोळीने फोर्टच्या व्यावसायिकाला धमकावण्यास सुरुवात केली आणि रक्कमही दुप्पट करत १ कोटीची मागणी केली. मात्र, व्यावसायिकाचा नकार कायम होता. दरम्यान, पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत यांच्या पथकाने शोध सुरू केला. त्यानुसार, व्यावसायिकाच्या मागावर असलेल्या एकाला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अन्य साथीदारांपर्यंत पोलीस पोहोचले. हरिश कोटीयन असे त्याचे नाव असून, तो कल्याणचा रहिवासी आहे. त्याच्यावर रेकी करण्याची जबाबदारी असे. त्याच्यापाठोपाठ डोंबिवलीच्या संकेत दळवी (२५) ला बेड्या ठोकल्या. त्यांच्या चौकशीतून अन्य तीन साथीदार व्यावसायिकावर गोळीबार करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.शनिवारी ते रत्नागिरीवरून दादर रेल्वे स्थानकात उतरणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, तपास पथकाने रत्नागिरीच्या नूरमोहम्मद खान (२५) आणि प्रथमेश कदम (२२), अनिकेत ठाकूरला अटक केली. खान हा शूटर आहे. त्यानेच भिवंडीतील हॉटेलवर गोळीबार केला होता. त्याच्याविरुद्ध गुन्हेही दाखल आहेत. कदमकडे चिठ्ठी पोहोचविण्याची जबाबदारी आहे. आरोपींकडून ३ मॅगझीन ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. पाचही आरोपींना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरेश पुजारीच्या सांगण्यावरून ही मंडळी काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.२० ते २२ व्यावसायिक रडारवरया हस्तकांनी मुंबई व ठाणे परिसरातील २० ते २२ व्यावसायिकांची माहिती सुरेश पुजारीला दिली होती. त्याच्या सांगण्यावरून त्यांना खंडणीसाठी धमकावणे सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.आरोपीने केले स्वत:वर वार...अटक टाळण्यासाठी या प्रकरणातील आरोपी संकेत दळवीने स्वत:वर ब्लेडने वार करून घेतले. मात्र खंडणीविरोधी पथकाने त्याच्या नाट्यावर वेळीच पडदा टाकत त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :मुंबई