Join us  

शॉर्टकट महागात पडला? पोलिसांचा प्राथमिक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 4:42 AM

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला निघालेल्या एमआरएम-१ स्पीडबोटीच्या अपघाताला कार्यकर्त्यांचा अतिउत्साह कारणीभूत ठरल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला निघालेल्या एमआरएम-१ स्पीडबोटीच्या अपघाताला कार्यकर्त्यांचा अतिउत्साह कारणीभूत ठरल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांनी बसण्याचा प्रयत्न केला. या वेळी ८ ते १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढले. अन्यथा या अपघाताचे स्वरूप मोठे असते. अपघाताच्या कारणांचा तपास कुलाबा पोलीस करत आहेत.स्पीडबोट निघण्यापूर्वी त्यात ३५ ते ४० प्रवासी बसले होते. या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर निघण्यास सांगितले. परंतु त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तरीही पोलिसांनी ८ ते १० जणांना हात धरून बाहेर काढले. लाइफ जॅकेट घालण्याचे आवाहनही करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.या कार्यक्रमासाठी आमदार, मुख्य सचिव, प्रकल्पाशी संबंधित शासकीय अधिकारी, पत्रकारांसाठी चार बोटींचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी संस्कृती बोट पुढे गेली. त्यामागोमाग सागरी पोलिसांची बोट निघणार होती. त्यामागून एमआरएम-१ बोट निघणार होती. मात्र पोलिसांच्या बोटीपूर्वीच एमआरएम-१ ही बोट निघाली. पुढे सुसाट निघालेल्या बोटीचा अपघात झाला. या ठिकाणी यापूर्वीही अपघात झाले आहेत. हा अपघात टाळण्यासाठी लांबच्या अंतरावरून शिवस्मारकाकडे जायचे ठरले होते, असे असतानाही हाच मार्ग चालकाने का निवडला? त्याला कोणी लवकर पोहोचण्यासाठी घाई केली होती का? याचा तपास सुरू असल्याची माहिती कुलाबा पोलिसांनी दिली.>पवारच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखलया अपघातात शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता सिद्धेश पवारचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली. यात चालकाच्या जबाबातून घटनाक्रम उघडकीस येईल, मात्र त्याच्यावर उपचार सुरू असल्याने अद्याप त्याचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.