Join us  

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा; १७ एप्रिलपर्यंत मिळणार नवा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना औषधांचा तुटवडा जाणवू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे बोललं जात आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक जिल्ह्यात रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे.

राज्यात मुंबई, ठाणे, अंबरनाथ, पुणे, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि नाशिकमध्ये पुन्हा रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रुग्ण, डॉक्टर, हॉस्पिटलसह सरकारलाही या इंजेक्शनसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. राज्यात सध्या ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून नवीन साठा १७ एप्रिलपर्यंत उपलब्ध होणार आहे, यावेळी ७० हजार इंजेक्शन्स मिळणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

काही खासगी डॉक्टर रुग्ण दवाखान्यात दाखल होताच त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन देतात. नियमाप्रमाणे एका रुग्णाला फक्त ६ इंजेक्शन द्यायचे असतात. इंजेक्शनचा साठा लक्षात घेता ज्यांना आवश्यकता आहे अशाच रुग्णांना डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे, अशा सूचनाही डॉक्टरांना देण्यात येणार आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

खासगी डॉक्टर कोरोना उपचारासाठी काही रुग्णांकडून अवाच्या सवा पैसे आकारत असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. याबाबत डॉ. शिंगणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, खासगी रुग्णालयांसाठी एक दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्या दरपत्रकानुसारच रुग्णांकडून पैसे घेणे अपेक्षित आहे. रुग्णांनी बरे झाल्यानंतर डॉक्टरांना पैसे देण्यापूर्वी बिलाची तपासणी करावी. आकारण्यात आलेले पैसे बरोबर आहेत का याची खात्री करून घ्यावे आणि मगच पैसे द्यावेत. यापूर्वी, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी या औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच घाऊक विक्रेत्यांना सुमारे ८०० ते १,३०० रुपये करण्यात येत होती. म्हणजेच सरासरी १,०४० रुपये या किमतीत याची विक्री होत होती. यानंतर आता कोरोना आजारावर प्रभावी पडणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

...............................