Join us  

सोमवारपासून दुकाने खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने घेतला आहे, अशी माहिती ललित गांधी यांनी प्रसार माध्यमांना दिली. ‘ब्रेक द चेन’च्या निर्णयात बदल करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाइन बैठक झाली असून, सरकार सकारात्मक आहे. त्यांनी २ दिवसांचा वेळ मागितला असून, त्यांच्या आश्वासनानुसार ९ तारखेला दुकाने सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे गुरुवारी ‘ब्रेक द चेन’ व व्यापार बंदवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, व्यापारी सभासद यांची चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक झाली. सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. गेले काही दिवस आपण सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. तसेच सरकारशी संपर्क करून आहोत. सर्वांच्या भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत, असेदेखील गांधी यांनी नमूद केले. दरम्यान, बैठकीला नाशिक, पुणे, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, चंद्रपूर, औरंगाबाद, येवला, सिंधुदुर्ग, जळगाव, तुर्भे, पालघर, वसई, तारापूर, चिपळूण, अंबरनाथ येथील ३०० हून अधिक व्यापारी संघटनांचे प्रमुख सहभागी झाले होते.