Join us  

धक्कादायक ! 'रेमडेसिविर'च्या काळ्याबाजारासाठी रुग्णाच्या कागदपत्रांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:06 AM

मेडिकलच्या कागदपत्र पडताळणीत उघड; मालवणी पोलिसांनी डॉक्टरचा जबाब नोंदवलागौरी टेंबकर - कलगुटकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

मेडिकलच्या कागदपत्र पडताळणीत उघड; मालवणी पोलिसांनी डॉक्टरचा जबाब नोंदवला

गौरी टेंबकर - कलगुटकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका २५ वर्षीय काेराेनाबाधित तरुणीच्या कागदपत्रांचा वापर एमआर चिरंजिवी शिवपूजन विश्वकर्मा (२८) याने मेडिकलमधून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी केल्याची धक्कादायक बाब मेडिकलमधील कागदपत्रे पडताळणीत उघड झाली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एका डॉक्टरचा जबाब नोंदविला असून, अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मालवणी पोलिसांनी हयात रुग्णालयाच्या मेडिकलमधील नोंदी पडताळून पाहिल्या. त्यावेळी इंजेक्शनची खरेदी करण्यासाठी विश्वकर्मा याने २५ वर्षीय काेराेनाबाधित तरुणीची कागदपत्रे तेथे जमा केल्याचे त्यांना समजले. त्यानुसार त्या खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरला त्यांनी चौकशीसाठी बोलावले. तेव्हा २५ वर्षांच्या तरुणीला कोरोना उपचारासाठी त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तिला उपचारासाठी रेमडेसिविरची गरज असल्याने बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर अखेर दोन इंजेक्शनची सोयही झाली. मात्र तरीही अजून चार इंजेक्शन कमी पडत होती. त्याच दरम्यान विश्वकर्मा हा त्यांच्या रुग्णालयात आला होता. त्यांच्यात चर्चेदरम्यान रुग्णाला ४ रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असल्याचे डॉक्टरकडून त्याला कळले. तेव्हा इंजेक्शनची सोय करून देताे, असे आश्वासन त्याने डॉक्टरला दिले व त्यांच्याकडून रुग्णाची कागदपत्रे घेतली.

या कागदपत्रांच्या मदतीने ११ एप्रिल, २०२१ रोजी त्याने तीन इंजेक्शन खरेदी केली. मात्र, ती संबंधित रुग्णाला न देता स्वतःकडेच ठेवली आणि नंतर सिद्धार्थ यादव (२१) याला ३० हजाराला विकली. दरम्यान, महिला रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने १४ एप्रिल, २०२१ रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, तिच्या कुटुंबियांनी कागदपत्रांबाबत पाठपुरावा केला नाही. याच कारणामुळे विश्वकर्मासारखे लाेक न घाबरता इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हयात रुग्णालयाच्या मेडिकलमधील कागदपत्रांची पडताळणी मालवणी पोलीस करत असून, अद्याप तरी त्यात काही संशयास्पद आढळले नसल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

* कागदपत्रे देताना सावधान

कोरोनाच्या उपचारात उपयोगी असणारे रेमडेसिविर रुग्णाला हवे असल्यास त्यांना त्यांचे आधारकार्ड, कोरोना चाचणी अथवा सिटीस्कॅन अहवाल, मागणीपत्र तसेच औषधांची यादी देणे आवश्यक असते. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी इंजेक्शन मिळविण्याच्या घाईत कोणालाही ही कागदपत्रे रुग्णाने किंवा कुटुंबियांनी देऊ नयेत, तसेच दिल्यास त्याबाबत योग्य तो पाठपुरावा करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले. लोकांनी सावध राहिल्यास अशा काळ्या बाजारावर वचक घालता येईल, असे त्यांनी सांगितले.