लॉकडाउन संपल्यानंतर वीज बिलांचा शॉक; उन्हाळ्यातील वापर पावसात फोडणार घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:28 AM2020-05-26T03:28:19+5:302020-05-26T06:33:18+5:30

सरासरी बिलांचा पुढील महिन्यांत फटका

 Shock of electricity bills after lockdown ends; Summer use will break a sweat in the rain | लॉकडाउन संपल्यानंतर वीज बिलांचा शॉक; उन्हाळ्यातील वापर पावसात फोडणार घाम

लॉकडाउन संपल्यानंतर वीज बिलांचा शॉक; उन्हाळ्यातील वापर पावसात फोडणार घाम

Next

- संदीप शिंदे 

मुंबई : लॉकडाउनमुळे मीटरचे रीडिंग शक्य नसल्याने सरासरी पद्धतीने तयार केलेली बिले ग्राहकांना एसएमएमसने पाठविली जात आहेत. लॉकडाउननंतर मात्र मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग घेऊन त्यावर उन्हाळ्यातील वाढीव वीज वापर नोंदविला जाईल. त्यानंतर हाती पडणारी बिले अनेकांना पावसाळ्यातही घाम फोडणारी असतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाउनमुळे वीज बिलांचे रीडिंग घेणे महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या वीज वितरण कंपन्यांना शक्य नव्हते. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार, गेल्या चार महिन्यांतील वीज बिलांची सरासरी रक्कम काढून मासिक बिल ग्राहकांना देण्यात आले. हेच सूत्र एप्रिल, मे महिन्यासाठी वापरण्यात आले. मीटर रीडिंगचा फोटो काढून पाठवा या आवाहनाला जेमतेम ५ टक्के ग्राहकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्यातील सुमारे १ कोटी ८० लाख घरगुती ग्राहकांना सरासरी पद्धतीनेच आकारणी झाली.

तापमानात वाढीमुळे दरवर्षी एप्रिल, मे महिन्यांत घरगुती वीज वापर साधारणत: २५ ते ३५ टक्क्यांनी वाढतो. बहुसंख्य घरगुती ग्राहक ० ते १०० युनिट या स्लॅबमधील आहेत. परंतु, उन्हाळ्यात ते १०० ते २०० युनिटच्या टप्प्यात जातात. या ग्राहकांना वाढीव दराने आकारणी होत असल्याने या महिन्यांतील बिलांची रक्कम कायमच जास्त असते. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे प्रत्येक जण घरात बंदिस्त असल्याने विजेच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांतील त्यांच्याकडून करण्यात आलेला वीज वापर हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात त्यांनी केलेज्या वापरापेक्षा किमान दीडपटीने जास्त असेल, अशी माहिती वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली.

बिलांची रक्कम होणार दुप्पट

एप्रिल, मे या दोन्ही महिन्यांत ग्राहकांना सरासरी बिले गेल्यामुळे वाढीव वीज वापराच्या नोंदी वितरण कंपन्यांकडे नाहीत. जूनमध्ये या नोंदी घेऊन बिल पाठवण्याचे नियोजन आहे. शिवाय वीज नियामक आयोगाने ५ ते ७ टक्के दरवाढही १ एप्रिलपासून लागू केली आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांतील तफावत एकाच बिलात समाविष्ट करून दिल्यास बिलांची रक्कम काही ठिकाणी दुप्पटही होईल, अशी दाट शक्यता आहे.

Web Title:  Shock of electricity bills after lockdown ends; Summer use will break a sweat in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.