Join us

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

By admin | Updated: May 29, 2014 01:32 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४१ वा शिवराज्याभिषेक सोहळा महाराजांचे चौदावे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत ६ जून रोजी रायगडावर रंगणार आहे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४१ वा शिवराज्याभिषेक सोहळा महाराजांचे चौदावे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत ६ जून रोजी रायगडावर रंगणार आहे. या वेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याची शपथ घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला होता. त्याची आठवण करून देण्यासाठी दरवर्षी राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यंदाही सप्तनद्या, सागर यांचे जलाभिषेक, राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात युवराजांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. शिवाय राज्यातील अनेक शिवकालीन युद्धकला विशारद आपले प्रात्यक्षिक रणहलगी व रणशिंगाच्या निनादात सादर करणार आहेत. या वेळी रंगणारा पालखी सोहळा व छत्रपतींच्या पादुकांची शोभायात्रा पाहण्यासाठी जगभरातून लाखो शिवप्रेमी या ठिकाणी जमा होतात. यंदाही ५ व ६ जून असा दोन दिवस हा उत्सव रंगणार आहे. याशिवाय युवराज छत्रपती संभाजी महाराज ५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता गड चढण्यास सुरुवात करतील. केवळ ४५ मिनिटांत गड चढण्याचा त्यांचा विक्रम आहे. त्यामुळे शिवप्रेमींना त्यांच्यासोबत गड चढण्याची संधी मिळणार आहे. दुर्ग संवर्धनाची मोहीम व्यापक करणार यंदाच्या सोहळ्यात ६ जूनला दुर्ग संवर्धनाची मोहीम व्यापक करण्यासाठी समितीतर्फे सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरात युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते झाली आहे. या सह्यांची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली नाही, तर सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)