Join us

शिवाजीनगर भाग आजही संपूर्णपणे दुर्लक्षितच

By admin | Updated: January 7, 2015 23:20 IST

दोन्ही बाजूने झोपडपट्टी आणि मध्यभागी भव्यदिव्य गृहसंकुले अशा स्वरुपात महापालिकेचा प्रभाग क्रं. २ रचला गेला आहे.

अजित मांडके - ठाणेदोन्ही बाजूने झोपडपट्टी आणि मध्यभागी भव्यदिव्य गृहसंकुले अशा स्वरुपात महापालिकेचा प्रभाग क्रं. २ रचला गेला आहे. डोंगरीपाडा ते मानपाडा भागातील शिवाजीनगर असा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रभाग म्हणूनही या प्रभागाची ओळख आहे. परंतु नव्याने निर्माण झालेल्या गृहसंकूलांना सर्व सोयी सुविधा आणि झोपडपट्टी भागात पिण्याची पाण्याची बोंब तर आहेच, शिवाय शौचालय, रस्ते, पायवाटा, गटारे आदींसह विजेच्या समस्येने येथील नागरीक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे शिवाजीनगर हा भाग या प्रभागात असूनही मागास असल्याचा भास होत आहे. नगरसेवकांनी देखील या भागावर जणू काही अघोषित बहिष्कार टाकल्याचे चित्र येथे असून, हा भाग आजही दुर्लक्षित राहिला आहे.पातलीपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, हिरानंदांनी इस्टेट, आयुक्त निवास, ब्रम्हांड, आझादनगरचा काही भाग आणि मानपाड्यातील शिवाजी नगर असा मिळून २० हजार ५२२ मतदारांचा असेलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा वॉर्ड आहे. परंतु या भागात समस्यांचा जणू डोंगरच रचला आहे. विशेष म्हणजे या प्रभागात असूनही नसल्या सारखा असलेला शिवाजीनगर हा भाग आजही दुर्लक्षित राहिला आहे. महावितरणच्या विजेच्या खेळखोंडबा, वारंवार तार तुटण्याचे प्रकार येथे घडत आहेत. त्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला तर तो पुन्हा येण्यास पाच ते सात तासांचा कालावधी जातो. गटारांची झालेली दुरावस्था ही एक येथील मोठी समस्या आहे. गटारांची कामे न झाल्याने, गटाराचे पाणी येथील रहिवाशांच्या घरात जात आहे. तसेच घुशींनी देखील काहींची घरे पोखरले आहेत. त्यामुळे आम्ही राहायचे कसे असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. मुलांना खेळायला मैदान आहे, परंतु मैदानाच्या एका बाजूला नाला आहे, या नाल्यावर स्लॅब टाकण्यात न आल्याने येथे लहान मुले पडण्याचे प्रकार घडत आहेत. नाल्याची भिंतही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे येथून शॉर्ट कटचा रस्ता समजून या मैदानातूनच अनेक दुचाकींसह चारचाकी वाहनांची ये जा सुरु असते. त्यामुळे खेळण्यास सज्ज असलेल्या मुलांचा खेळ मोडला जात आहे. विशेष म्हणजे पूर्वी या मैदानात घंटागाडी येत होती. परंतु आता ती येत नसल्याने मैदानातच कचऱ्याची ढिग साचले असून या भागात मच्छरांची पैदास वाढली आहे. शौचालय असून नसल्या सारखे आहे, शौचालयाच्या टाकी असलेला पाईप फुटल्याने त्यातील दुर्गंधी पाणी या भागात अवास्तव वाहतांना दिसत आहे. येथील समस्यांबाबत वारंवार स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी नागरीकांनी केल्या आहेत. परंतु अद्यापही या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याची खंत नागरीकांनी व्यक्त केली आहे. यात सर्वात मोठी समस्या म्हणजे, नळावाटे येणारे पाणी हे अतिशय गढूळ येत असून नागरीकांना नळाला पाणी आल्यानंतर अर्धातास नळ सुरु ठेवावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी येथील जलवाहीनी बदलण्यात आली होती. परंतु तरीदेखील नागरीकांना गढूळ आणि दुर्गंधी पाणी प्यावे लागत आहे. दुसरीकडे डोंगरीपाडा येथील किंगकॉंग नगर भागात अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून या भागांना पालिकेने पाणी देण्यास मज्जाव केला आहे. शिवाजी नगर भागातील समस्येसंदर्भात दोन्ही नगरसेवकांना वारंवार निवेदन देण्यात आली आहेत. परंतु तुमचा एरियाच आमच्या प्रभागात येत नसल्याचे म्हणने नगरसेवकांनी व्यक्त केल्याने आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, अशी समस्या शिला गुंडाळे यांनी मांडली.शौचालय आणि गटारांची समस्या या भागातील मोठी समस्या असून शौचालयाचा पाईप फुटल्याने त्याचे पाणी रस्त्यावर येत आहे. नगरसेवकांना निवडून दिले परंतु ते या भागाकडे लक्षच देत नाहीत, असा आरोप शोभा जाधव यांनी केला.आरोग्य केंद्र आहे, परंतु तेथे सुविधांची वानवा आहे. केंद्रात एकच डॉक्टर असल्याने, सकाळी उपचारासाठी नंबर काढला तर दोन तासाने नंबर लागत आहे, असे अशोक सोनावले यांनी सांगितले.प्रभागात समस्या अनेक आहेत. परंतु या समस्या सोडविण्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने आमचे हात बांधलेले आहेत. स्मशानभूमी, पायवाटा, गटार आदींसह विविध समस्या या भागात असून या समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यावर अपुरी राहिलेली कामे पूर्ण केली जातील. - बिंदू मढवी, नगरसेविका, शिवसेना प्रभाग मोठा असून नगरसेवक निधी हा केवळ ६० लाख आहे, त्या निधीची वर्गवारी करुन, तिसऱ्या टप्यात शिवाजी नगर भागाचे काम करण्यात येणार आहे. परंतु सध्या पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने कोणत्याच कामाला निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे आमचे हात देखील आखडते झाले आहेत. - मनोहर डुंबरे, नगरसेवक, राष्ट्रवादी