Join us  

'विदेशी षडयंत्रात शिवसेनेचे हस्तक, 'टुलकीट' प्रकरणात जिल्हा प्रमुखाचाच भाऊ आरोपी'

By महेश गलांडे | Published: February 16, 2021 3:42 PM

राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि एक व्हिडिओ शेअर करुन शिवसेनेवर टोकाचे बाण चालवले आहेत. भारत मातेला बदनाम करू पाहणाऱ्या विदेशींच्या षडयंत्रामध्ये शिवसेनेतील काही हस्तक सामिल असल्याचा थेट आरोप कदम यांनी केलाय

ठळक मुद्देराम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि एक व्हिडिओ शेअर करुन शिवसेनेवर टोकाचे बाण चालवले आहेत. भारत मातेला बदनाम करू पाहणाऱ्या विदेशींच्या षडयंत्रामध्ये शिवसेनेतील काही हस्तक सामिल असल्याचा थेट आरोप कदम यांनी केलाय

मुंबई : कृषी कायद्याविरोधात सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात ‘टूलकिट’ प्रसार करणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याच प्रकरणात दिशा रवी या तरुणीला अटक झाली असून, व्यवसायाने वकील असलेली निकिता जेकब आणि बीडमधील पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनू मुळूक हे दोघेही संशयित आहेत. या दोघांवरही दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर निकिता जेकब हिने मुंबई उच्च न्यायालयात तर शंतनू याने औरंगाबाद खंडपीठात ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. शंतनू हा बीडमधीलशिवसेना नेत्याचा चुलतभाऊ आहे, त्यामुळे भाजपा आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केलीय. 

राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि एक व्हिडिओ शेअर करुन शिवसेनेवर टोकाचे बाण चालवले आहेत. भारत मातेला बदनाम करू पाहणाऱ्या विदेशींच्या षडयंत्रामध्ये शिवसेनेतील काही हस्तक सामिल असल्याचा थेट आरोप कदम यांनी केलाय. राम कदम यांनी टुलकीट प्रकरणी आरोपी असलेला शंतनू मुळूक हा बीडमधील शिवसेना नेत्याचा भाऊ असल्याचं म्हटलंय. तसेच, सत्तेच्या सिंहासनासाठी शिवसेना खालच्या स्तराला गेलीय, आता स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. हिंदुत्व आणि देशहिताच्या गोष्टी करणारी शिवसेना खालच्या स्तराला गेली असून विदेशींच्या षडयंत्रामध्ये शिवसेनेतील काही हस्तक आहेत, असे कदम यांनी म्हटलं आहे. 

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी ‘टूलकिट’ तयार केले. तसेच ते खलिस्तानच्या समर्थकांशी थेट संपर्कात होते. निकिता जेकबने दाखल केलेल्या या याचिकेवरील सुनावणी न्या. प्रकाश नाईक यांच्या एक सदस्यीय खंडपीठापुढे होती. जेकबने चार आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. आपल्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा खोटा आहे, असे जेकबने याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे. दरम्यान, शंतनूचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होते. मात्र, त्यांना शंतनू सापडला नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे सूत्रांकडून समजते. बीडमधील संशयित शंतनूचे जागतिक पातळीवर पर्यावरणासंदर्भात काम आहे. या तरुणासह इतर चार अशा पाच लोकांचा ग्रुप असल्याचे सांगण्यात येते. याच ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दर्शविला होता, असेही सूत्रांकडून सांगण्यात येते.

भारतरत्नांची चौकशी नको

राम कदम यांनी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गानकोकीळा लता मंगेशकर आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच अभिनेता अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांच्या ट्विटची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, काँग्रेसची भाषा बोलणारे सेलिब्रिटीची सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा, हृतिक रोशन, स्वरा भास्कर, अली फजल, रवीश कुमार, हार्दिक पटेल अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींत्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी राम कदम यांनी अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

 

टॅग्स :शिवसेनाबीडराम कदम