उमेदवार ठरला! शिवसेनेचा संभाजीराजेंना धक्का; संजय पवारांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 08:12 AM2022-05-25T08:12:19+5:302022-05-25T08:13:09+5:30

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला

Shiv Sena's push to Sambhaji Raje; Opportunity for Sanjay Pawar | उमेदवार ठरला! शिवसेनेचा संभाजीराजेंना धक्का; संजय पवारांना संधी

उमेदवार ठरला! शिवसेनेचा संभाजीराजेंना धक्का; संजय पवारांना संधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/काेल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांना, ‘आधी शिवसेना प्रवेश मगच राज्यसभेची संधी’ या ऑफरवर शिवसेना ठाम राहिली. दुसरीकडे संभाजीराजे शिवसेनेत जाण्यास नकार देत अपक्ष उमेदवार म्हणूनच लढण्यावर ठाम राहिले. अखेर शिवसेनेने त्यांना धक्का देत आपले कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. या घटनाक्रमामुळे आता छत्रपती संभाजीराजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार नसतील, हे स्पष्ट झाले. 

संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळ्याला उमेदवारी दिली. ते कट्टर शिवसैनिक आहेत, पक्का मावळा आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात. आम्ही सगळे जे आहोत ते मावळ्यांच्या जीवावर उभे आहोत,  असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. आमच्या दृष्टीने उमेदवारीचा चॅप्टर क्लोज झाला आहे. आता शिवसेनेचे दोन संजय (मी स्वत: व संजय पवार) राज्यसभेवर जातील. संभाजीराजे यांचा आम्ही नक्कीच सन्मान ठेवतो. त्यांच्या गादीविषयी आदर असल्यानेच आम्ही संभाजीराजे यांना शिवसेनेत येऊन राज्यसभा लढण्याचा प्रस्ताव दिलेला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदारकीसाठी अगतिक नाही, अपक्षच लढणार

खासदारकीसाठी मी अगतिक आहे असे अजिबातच नाही. शिवशाहूंचा विचार, मराठा व बहुजन समाजाचे प्रश्न घेऊन स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून माझे कार्य सुरूच राहील
    - संभाजीराजे छत्रपती

n शिवसेना असो, की अन्य कोणताही पक्ष असो, 
मी त्या पक्षात थेट प्रवेश करणार नाही. राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे निश्चित केले असून या पक्षांनी मला पाठिंबा द्यावा, हीच ठाम भूमिका घेऊन मी पुढे जात आहे. 
n महाविकास आघाडीने माझी उमेदवारी पुरस्कृत केल्यास त्यास माझी तयारी आहे, असे संभाजीराजे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. 

समर्थन न दिल्याबद्दल संघटनांची तीव्र नाराजी
शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना समर्थन न दिल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील म्हणाले, की संभाजीराजे यांना सन्मानित करण्याऐवजी शिवसेनेने पाठिंबा नाकारला. भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनीही उमेदवारी नाकारल्याबद्दल शिवसेनेवर टीका केली.

काेण आहेत संजय पवार?

n शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख. 
n गेली तीस वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते. 
n ३ वेळा नगरसेवक राहिले आहेत. 
n स्थायी सभापती, विरोधी पक्षनेतेपदही महापालिकेत भूषवले.

मातोश्री हे आमचे मंदिर आहे. पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय दिला, याचा खूप आनंद आहे.
    - संजय पवार,
शिवसेना जिल्हाप्रमुख, 
    कोल्हापूर

Web Title: Shiv Sena's push to Sambhaji Raje; Opportunity for Sanjay Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.