मुंगीचा रंग हिरवा नाही, हेच खरे रहस्य आहे; शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 07:06 AM2020-05-21T07:06:46+5:302020-05-21T07:09:16+5:30

नेपाळ हे आता हिंदुस्थानविरोधात चीनचे हुकमी प्यादे बनले आहे, पण आपण व आमचे राज्यकर्ते फक्त पाकिस्तानवरच बोलण्यात, सर्जिकल स्ट्राइकचे राजकारण करण्यात धन्यता मानतात.

Shiv Sena's allegations against BJP over Nepal New Map Controversy pnm | मुंगीचा रंग हिरवा नाही, हेच खरे रहस्य आहे; शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप

मुंगीचा रंग हिरवा नाही, हेच खरे रहस्य आहे; शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप

Next
ठळक मुद्देआता नेपाळचा मुखवटा लावून इतर सीमाही अस्थिर व अशांत करीत आहेविष्णूच्या भूमीवर आज हिंदुस्थानविरुद्धच्या कटकारस्थानांचे ‘फड’ बसले आहेत चीनच्या इशाऱ्याशिवाय नेपाळ ही आगळीक करूच शकत नाही.

मुंबई - लिंपियाधुरावर नेपाळने दावा सांगितला हा धक्काच आहे. महाकाली म्हणजे शारदा नदीचा उगम लिंपियाधुरामध्ये आहे तो आपल्या उत्तराखंड राज्याचा भाग आहे. चीन आजही सिक्कीमच्या सीमेवर कुरापती करीत आहे. अरुणाचल, लडाख- लेहमध्ये घुसखोरी करीत आहे. आता नेपाळचा मुखवटा लावून इतर सीमाही अस्थिर व अशांत करीत आहे. चीनच्या कच्छपी लागून नेपाळ हिंदुस्थानला आव्हान देत असेल तर भक्त मंडळी व त्यांचे दिल्लीश्वर कोणती पावले उचलणार? हाच प्रश्न आहे. नेपाळची मुंगी हत्तीच्या कानात शिरली आहे, पण हत्ती सोंडेचे फटके मारायला तयार नाही. मुंगीचा रंग हिरवा नाही, हेच खरे रहस्य आहे असा आरोप सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपा सरकारवर केला आहे.

तसेच नेपाळ हे आता हिंदुस्थानविरोधात चीनचे हुकमी प्यादे बनले आहे, पण आपण व आमचे राज्यकर्ते फक्त पाकिस्तानवरच बोलण्यात, सर्जिकल स्ट्राइकचे राजकारण करण्यात धन्यता मानतात. आता नेपाळमध्ये जो नकाशावाद सुरू आहे, ती आगळीक पाकड्यांनी केली असती तर भक्तांच्या फौजा व त्यांच्या अंकीत वृत्तवाहिन्यांनी इतक्यात शब्द बॉम्ब आपटून युद्धच पुकारले असते, पण नेपाळच्या बाबतीत राजकीय लाभ नाही. येथे हिंदू-मुसलमान झगडा होऊ शकत नाही. त्यामुळे तोंडात ‘मास्क’ कोंबून सगळेच थंड बसले आहेत असा घणाघातही शिवसेनेने केला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

  • जग कोरोनाशी लढत असताना अनेक देश अजूनही सीमावादातच अडकले आहेत. त्या राष्ट्रांत आता नेपाळची भर पडावी याचे आश्चर्य वाटते. नेपाळसारख्या कायम परावलंबी राष्ट्रानेही हिंदुस्थानच्या भूभागावर दावा केला आहे. नेपाळ सरकारने जो नवा नकाशा मंजूर केला आहे त्यात लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरासारखे महत्त्वाचे संवेदनशील भाग ‘नेपाळ’चे म्हणून दाखवले आहेत.
  • नेपाळने हे करावे, हे आम्हाला तरी आक्रित वाटत नाही. नेपाळ नेहमीच चीन आणि पाकिस्तानच्याच ओंजळीने पाणी पीत असतो. चीन आणि पाकिस्तान नेपाळच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदुस्थानवर हल्ले करीत असतात. नेपाळ हे कधीकाळी हिंदू राष्ट्र वगैरे होते.
  • नेपाळचा राजा हा विष्णूचा अवतार समजला जात असे, पण विष्णूच्या भूमीवर आज हिंदुस्थानविरुद्धच्या कटकारस्थानांचे ‘फड’ बसले आहेत व नेपाळचे नवे ‘नकाशा’ प्रकरण हा त्यातलाच एक भाग आहे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे. चीनच्या इशाऱ्याशिवाय नेपाळ ही आगळीक करूच शकत नाही.
  • लिपुलेख या भागात हिंदुस्थान, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. त्यामुळे हा भाग चीनच्या डोळ्यात आहे. नेपाळचे सरकार ‘चीन’ चालवीत आहे. हिंदुस्थानचे नेपाळवर कोणतेही नियंत्रण नाही. नेपाळच्या बाबतीतली सर्व राजनैतिक मुत्सद्देगिरी गेल्या पाच-सहा वर्षात अपयशी ठरताना दिसत आहे.
  • मुख्य म्हणजे नेपाळ व हिंदुस्थानची धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक नाळ एक आहे, पण नेपाळला चीन आणि पाकिस्तान जवळचा वाटतो. पंतप्रधान मोदी हे दोनेक वर्षांपूर्वी नेपाळ दौरा करून आले. तेव्हा देशात उत्तर प्रदेश निवडणुकांचे मतदान सुरू होते. त्याच दिवशी पंतप्रधान काठमांडूस पोहोचले. तेथे पशुपतीनाथ मंदिरात जाऊन पूजा-अर्चा केली. गाईची पूजा केली. नेपाळला आर्थिक मदतही जाहीर केली.
  • सीतामाईच्या नावाने एक विशेष रेल्वे गाडी सोडण्याची घोषणा करून पंतप्रधान परत आले. उत्तर प्रदेशातील हिंदू मतदारांना प्रभावित करण्याची ही नामी शक्कल होती. नेपाळ व आपल्यात कसे भावनिक नाते आहे वगैरे सांगायलाही आपले राज्यकर्ते विसरत नाहीत, पण नेपाळ खरोखरच आपले राहिले आहे काय?
  • नेपाळातून हिंदी हद्दपार करण्यात आली व चिनी भाषेचे शिक्षण देणारे वीस हजार शिक्षक तेथे पाच वर्षांपासून गावागावातील शाळांमध्ये हिंदू संस्कृतीवर माती फिरवत आहेत. यावर दिल्लीने काय कारवाई केली? चिनी भाषा नेपाळची पहिली किंवा दुसरी भाषा होताना दिसत आहे.
  • नेपाळमध्ये आता चीनचा माओवाद कोरोना विषाणूसारखा पसरला आहे व लोकशाही संसदीय व्यवस्था हा फक्त देखावा उरला आहे. राजेशाहीचा म्हणजे विष्णू अवताराचा खून करून जी व्यवस्था सत्तेत आली ती हिंदुस्थानला आव्हान देत आहे.
  • नेपाळच्या भूमीवर हिंदुस्थानच्या बनावट नोटा आजही छापल्या जातात. पाकिस्तानचे अतिरेकी उजळ माथ्याने नेपाळच्या भूमीचा वापर करीत आहेत. नेपाळात मशिदी व मदरशांची संख्या वाढत आहे व हिंदुत्वाचा ऱ्हास होताना दिसत आहे. नेपाळचे राजकारण आता हिंदुस्थानधार्जिणे राहिलेले नाही.
  • नेपाळसारखे राष्ट्रही ‘महासत्ता’ वगैरे बनू पाहणाऱ्या देशाला डोळे वटारते हे लक्षण चांगले नाही. हिंदुस्थानने 2 नोव्हेंबर 2019 रोजी आपला नवा नकाशा जारी केला होता. या नकाशात लिपुलेख, कालापानी व लिंपियाधुरा हा भाग हिंदुस्थानच्याच अंमलाखाली असल्याचे दाखवले होते. तेव्हाही नेपाळने टोपी उडवून निषेध केला होता.
  • आश्चर्य म्हणजे काही दिवसांपूर्वीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडमधील घाटीयाबाद गड ते लिपुलेख या मार्गाचे उद्घाटन केले होते. हिंदुस्थानने लिपुलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. 80 किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यामुळे कैलास-मानसरोवरला जाणाऱ्या हिंदू यात्रेकरूंना फायदाच होणार आहे.
  • नेपाळने या रस्त्यालाच आक्षेप घेण्याची हिंमत दाखवली ती काय चीनची फूस असल्याशिवाय? लिंपियाधुरावर नेपाळने दावा सांगितला हा धक्काच आहे.

Web Title: Shiv Sena's allegations against BJP over Nepal New Map Controversy pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.