Join us  

शिवसेनेला मतांची चिंता; दिशाभूल करण्यासाठी नामांतराचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी काँग्रेसच्या भूमिकेचा पुनरुच्चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी काँग्रेसच्या भूमिकेचा पुनरुच्चार करतानाच शिवसेना आणि भाजप जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. शिवसेनेला मतांची चिंता वाटत असल्यानेच त्यांनी नामांतराचा सामना सुरू केला आहे. तर, ढोंगीपणा हे भाजपचे वैशिष्ट्यच असल्याने त्यांच्या बोलण्याकडे जनता करमणूक म्हणूनच पाहते, असा टोला थोरात यांनी लगावला.

औरंगाबाद नामांतरावरून सुरू असलेल्या वादावर बाळासाहेब थोरात यांनी रविवारी सोशल मीडियावर पत्रक जारी करीत नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय, असा प्रश्न उपस्थित करीत पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करीत असल्याचा आरोप केला. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करीत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही, असा सवाल करतानाच अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपने औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे; म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्त्वाचा आहे, असे थोरात म्हणाले.

दरम्यान, औरंगजेब तुमचा कोण, अशा भाषेत शिवसेना नेत्यांकडे अलीकडे काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. यावर, छत्रपतींचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करीत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असे थोरातांनी स्पष्ट केले.

चौकट

पण, महाविकास आघाडी स्थिर

एकीकडे नामांतरावरून शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवितानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकार मात्र स्थिर आणि खंबीर असल्याचा दावाही थोरातांनी केला. नामांतराच्या मुद्द्यावर सरकार अस्थिर होईल, या भ्रमात कोणी राहू नये. एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही.