Join us  

सेना गड राखणार की महायुतीचा उमेदवार उभा राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 6:02 AM

मूळचा ठाणे जिल्ह्याचा हिस्सा असलेला दहिसर १९५६ मध्ये मुंबईला जोडला गेला.

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील शेवटचे टोक म्हणून ओळखला जाणारा दहिसर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेच्या गड-कोटांच्या यादीत होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांत युती फिस्कटली आणि मोदी लाटेत व आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत भाजपचा झेंडा या विधानसभा मतदारसंघावर फडकवण्यात भाजपला यश मिळाले. त्यामुळे भाजप - शिवसेनेचा वरचष्मा राहिलेल्या, मराठी भाषिकांचे प्रमाण जास्त असले तरी व्यापारी वर्गाचे प्राबल्य असलेल्या दहिसर विधानसभा मतदारसंघात यशाची जादुई छडी कोण चालवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.मूळचा ठाणे जिल्ह्याचा हिस्सा असलेला दहिसर १९५६ मध्ये मुंबईला जोडला गेला. १५३ क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघात एकूण २९३ मतदान केंद्रे असून आरक्षणनिहाय खुला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेकडून हा मतदारसंघ खेचून घेतला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ५०. ५० टक्के मतदान झालेल्या या विधानसभा मतदारसंघात मनीषा चौधरी यांनी ७७ हजार २३८ मतांनी विजय मिळविला होता.तर शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांना त्या वेळेच्या आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच फटका बसला असून ३८ हजार ६६० मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यामागोमाग काँग्रेसच्या शीतल म्हात्रे आणि मनसेच्या शुभा राऊळ यांची वर्णी लागली. २०१४ च्या निवडणुकीत शीतल म्हात्रे यांना २१ हजार ८८९ तर शुभा राऊळ यांना १७ हजार ४३९ मते मिळाली होती. व्यापारी वर्ग आणि मराठी मतांचा दबदबा असूनही १ हजार ९०७ मतदारांनी ‘नोटा’चा हक्क बजावला होता.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात भाजपतर्फे नगरसेविका मनीषा चौधरी, काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शिवसेनेतून मनसेत गेलेल्या नगरसेविका डॉ. शुभा राऊळ यांची कडवी लढत पाहण्यास मिळाली. युतीच्या विभागणाऱ्या आणि मनसेच्या मतांमुळे म्हात्रे यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या़त्यांना शिवसेनेचा गड सर करणे सहजासहजी शक्य होणार नाही हेही तितकेच खरे मानले जात होते. मुंबईचे महापौरपद भूषविलेल्या डॉ. राऊळ यांनी वैयक्तिक संपर्काप्रमाणेच मनसेच्या पाठबळावर शर्थीची लढत दिली. भाजपच्या मनीषा चौधरी यांची भाजपच्या पारंपरिक मतांवर भिस्त असल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. या मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या सव्वा ते दीड लाखांवर असून, मराठी मते ८० हजारांच्या आसपास आहेत. या मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, ख्रिस्ती भाषिकांचे प्राबल्य आहे.निकालाअंती या निवडणुकीमध्ये मनीषा चौधरी या पहिल्यांदाच विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या. याआधी त्यांनी भाजपच्या रचनेमध्ये विविध पदांवर भूमिका पार पाडली आहे. २००९ पासून त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यदेखील राहिल्या आहेत. याशिवाय मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याच वर्षी त्या निवडूनदेखील आल्या होत्या. ठाण्यामध्ये त्यांनी भाजपच्या विविध समित्यांवर कामगिरी बजावली आहे.मुंबई उपनगरातील नागरी सोयीसुविधांचे प्रश्न कायम असून, त्याचे निराकरण करणाºया महापालिका, एमएमआरडीए, राज्य अथवा केंद्र सरकार अशा भिन्न यंत्रणा असल्या, तरी या साºयाला काँग्रेस-राष्ट्रवादीची नेतेमंडळीच जबाबदार असल्याचा समज पश्चिम उपनगरातील मतदारांमध्ये आहे. तो गैरसमज मिटविण्याबाबत दोन्ही काँग्रेसचे नेते कमी पडत आहेत. या वेळी दहिसर मतदारसंघ शिवसेना पुन्हा ताब्यात घेणार की भाजप कायम राखणार? की मग महायुतीचा नवखा उमेदवार यानिमित्ताने समोर येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :शिवसेना