Join us  

शिवसेना करणार विकास आराखड्याची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:16 AM

राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या मुंबईच्या विकास आराखड्याचा वाद आणखीच चिघळत चालला आहे.

मुंबई : राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या मुंबईच्या विकास आराखड्याचा वाद आणखीच चिघळत चालला आहे. मुंबईच्या विकास आराखड्यात असंख्य त्रुटी असल्याचे म्हणत शिवसेनेने राज्य सरकारवर टीकास्त्र उगारल्यानंतर आता भाषेच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेने राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या मुंबईच्या विकास आराखड्याची शिवसेनेकडून आता होळी करण्यात येणार आहे.मुंबईचा विकास आराखडा हा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असताना राज्य सरकारने तो इंग्रजीमध्ये प्रसिद्ध केला. त्यामुळे मराठीची गळचेपी होत असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र सरकारने १९६४ मध्ये मराठी राजभाषा कायदा केला. त्यानुसार सर्व शासकीय कामकाज मराठी भाषेत होणे अपेक्षित आहे. मात्र, मागील ५४ वर्षांत या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नाही. अगदी अलीकडे म्हणजे मे महिन्यात सरकारने पुन्हा एकदा मराठी भाषेची कास धरली आहे आणि नस्ती (फाइल) वरील शेरे, सूचना, स्वाक्षरी, पत्रव्यवहार, परिपत्रके, अधिसूचना, शासन निर्णय आणि इतर सर्व कार्यालयातील कामकाज मराठी भाषेतून करण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील मुंबईच्या जिव्हाळ्याचा आणि मुंबईकरांशी निगडित असलेल्या मुंबईचा विकास आराखडा इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कारणास्तव मराठीची गळचेपी झाली असून, हा मातृभाषेचा अपमान आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.परिणामी, राज्य सरकारचा निषेध करण्यासह आपला संताप व्यक्त करण्यासाठी १७ जून, रविवारी दुपारी १२ वाजता कुर्ला पश्चिमेकडील काजूपाडा मैदानात राज्य शासनाने इंग्रजी भाषेत छापलेल्या मुंबईच्या विकास आराखड्याची होळी करण्यात येणार असल्याचे दिलीप लांडे यांनी सांगितले.>सुधारणा करण्याची मागणीदरम्यान, राज्य सरकारने मुंबईच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. मात्र, मुंबईच्या विकास आराखड्यात त्रुटी आहेत. महत्त्वाचे म्हणजे आयुक्तांना अधिकार देत असतानाच महापालिकेचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परिणामी, शासनाने ८ मे रोजी सूचना व हरकतीसाठी जाहीर केलेल्या २०१८-३४ च्या बृहन्मुंबई विकास आराखड्यात सुधारणा करावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.>‘निवडणुका आल्यावर मराठी माणसांची आठवण’मुंबईचा विकास आराखडा मराठीमध्ये नसल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. शासनासह महापालिकेचे शंभर टक्के कामकाज मराठीतून चालले पाहिजे, असा अध्यादेश असताना शासन इंग्रजीला का महत्त्व देते आहे, असे वरकरणी प्रामाणिक वाटणारा प्रश्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विचारला आहे.गेली २५ वर्षे मुंबई पालिका ताब्यात असणाºया सेनेच्या नेतृत्वाला विकास आराखडा मुळात मराठीत असावा लागतो, हे त्यांचे अज्ञान आहे की दांभिकपणा? त्यामुळे मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे, शिवसेनेला मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा पुळका आलेला आहे.प्रत्यक्षात मुंबईकरांचे प्रश्न कुजविणाºया शिवसेना पक्षाने, आता तरी प्रतीकात्मकतेचे राजकारण थांबवून मुंबईकरांची व मराठी माणसांची फसवणूक थांबवावी, असे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी म्हटले आहे.