Shiv Sena feels that I want to contest from the north-east Mumbai, but not BJP - Ramdas Athavale | ईशान्य मुंबईतून मी निवडणूक लढावी असे शिवसेनेला वाटते,मात्र भाजपला नाही - रामदास आठवले
ईशान्य मुंबईतून मी निवडणूक लढावी असे शिवसेनेला वाटते,मात्र भाजपला नाही - रामदास आठवले

मुंबई - लोकसभा निवडणूक मी ईशान्य मुंबईतून लढावी, अशी येथील जनतेची भावना आहे. शिवसेनेला ही असे वाटत आहे. मात्र ज्यांना वाटावं त्या भाजपला मी ईशान्य मुंबईतून लढावं असं अजून वाटत नाही, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

रामदास आठवले म्हणाले की, भाजपला वाटते मी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी तर शिवसेनेला वाटते मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी. मात्र या दोन्ही जागेपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला निश्चित मिळावी अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. 

घाटकोपर पूर्व कामराज नगर येथे स्वच्छ भारत अभियान अंतरंगात मुंबई महापालिकेच्या निधीतून सार्वजनिक स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे. त्याच्या लोकार्पणानिमित्त आयोजित जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते. कामराजनगर मधील जनता विकास कामांपासून वंचित आहे. त्यांच्या प्रश्नांकडे स्थानिक खासदार किरीट सोमय्या लक्ष देत नाहीत. पाच वर्षांत आमचा खासदार आम्हाला दिसलाच नाही अशी नाराजी स्थानिक शिवसेना नगरसेवक परमेश्वर कदम यांनी यावेळी व्यक्त केली. 

रामदास आठवले हेच ईशान्य मुंबईचे खासदार व्हावेत, असे नगरसेवक परमेश्वर कदम यांनी आपल्या भाषणातून ईच्छा व्यक्त केली. यावर उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले की, इथे शिवसेना भाजप असा वाद करू नका. आता शिवसेना भाजप युती झाली आहे. आम्ही शिवसेना भाजप दोन्ही पक्षांच्या युती सोबत आहोत. आम्हाला लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांनी प्रत्येकी एक जागा सोडली पाहिजे. शिवसेना नगरसेवकांना आणि  ईशान्य मुंबईतील अनेक कार्यकर्त्यांना मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी, असे वाटते मात्र ज्यांना असं  वाटायला पाहिजे त्यांना अजून वाटत नाही अशी खंत रामदास आठवले यांनी भाजपचं नाव न घेता व्यक्त केली.  

दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई दोन्ही पैकी कोणत्याही मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढण्याची आपली तयारी आहे. एक ही मतदार संघ रिपाइंला नाही सुटला तरी मी राज्यसभेवर आहे .आगामी लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात  एनडीए सरकारचाच विजय होणार असून तुमचे गोरगरीब जनतेचे  प्रश्न सोडविण्यासाठी मला केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद निश्चित मिळेल,अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी बोलून दाखवली.


Web Title: Shiv Sena feels that I want to contest from the north-east Mumbai, but not BJP - Ramdas Athavale
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.