Join us  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, वाहतूक बेट येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, वाहतूक बेट येथे उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी शनिवारी (दि.२३) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र स्थानिक रहिवासी नियमावर बोट ठेवत सार्वजनिक रस्त्यावर पुतळा उभारण्यास विरोध केला.

दक्षिण मुंबईत महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे.

या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी आमंत्रित केले. मात्र एकीकडे या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना कुलाबामधील बिगर शासकीय संस्थांनी आक्षेप घेतला आहे. २०१३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक रस्त्यावर कोणताही पुतळा उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कुलाबा येथील रस्त्यावर ठाकरे यांचा पुतळा उभारण्यास स्थानिकांचा विरोध आहे.

* जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि सामाजिक कार्याचे स्मरण लोकांसमोर कायम रहावे, यासाठी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे.

* शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला.