Uddhav Thackeray: “एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र विद्रुप का करता, मुंबई ओरबाडण्यासाठीच हवी काय?” उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 05:24 AM2022-05-15T05:24:40+5:302022-05-15T05:25:40+5:30

आम्ही संयम बाळगतोय म्हणजे आम्ही नामर्दांची औलाद नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही सोडत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

shiv sena chief and cm uddhav thackeray criticize bjp over mumbai and maharashtra politics | Uddhav Thackeray: “एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र विद्रुप का करता, मुंबई ओरबाडण्यासाठीच हवी काय?” उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: “एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र विद्रुप का करता, मुंबई ओरबाडण्यासाठीच हवी काय?” उद्धव ठाकरे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कधी म्हणतात शिवसेना सोबत येईल, कधी म्हणता राष्ट्रवादीसोबत सरकार करू. आता त्यातलं काहीच हाताला लागत नसल्याने एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्राला विद्रुप करण्याचे काम का करत आहात, असा सवाल मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानांतर्गतच्या सभेत भाजपला केला. मी सुसंस्कृतपणाने सांगतो, एकत्र बसून महाराष्ट्र पुढे नेऊया, असे आवाहन त्यांनी केले. 

आमच्या कुटुंबाची बदनामी करताय. आम्ही कधी तुमची बदनामी केली नाही. ती आमची संस्कृती नाही. सुशांत सिंहचं काय झालं? नुसतं बोंबलायचं! आम्ही संयम बाळगतोय म्हणजे आम्ही नामर्दांची औलाद नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही सोडत नाही. एकतर्फी प्रेमात अपयश ठरलेल्या प्रियकरासारखे तुम्ही वागत आहात, असेही त्यांनी भाजपला सुनावले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे ७५ वर्षे साजरे करतो आहोत, पण आपला रुपया त्याही पुढे जाऊन पडला आहे. महागाईवर भाजपवाले का बोलत नाहीत. अतिरेकी येताहेत, काश्मिरी पंडितांना मारताहेत, तिकडे जाऊन काय करायचं. हनुमान चालिसा म्हणणार की घंटा वाजवणार, असा सवालही त्यांनी केला. आमच्या हिंदुत्वाचे माप घेणारे तुम्ही कोण? आमचे हिंदुत्व तकलादू नाही आणि आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकार राज्यातील नेत्यांना सुरक्षा पुरवित असल्याच्या मुद्यावर ठाकरे म्हणाले की, कोणत्या भोक पडलेल्या टिनपाटांना सुरक्षा देताय? काश्मिरात राहुल भट्टची हत्या झाली, तिकडे सुरक्षा द्या. औरंगाबादमध्ये ओवैसी हे औरंगजेबाच्या थडग्यावर गेले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ओवैसी डोकं टेकवून आला. कुणाला तरी थडग्यावर पाठवायचं, कुणाच्या तरी हातात भोंगा, कुणाच्या हाती हनुमान चालिसा द्यायची, ही यांची एबीसीडी टीम. त्यांना पाठवायचं आणि स्वत: मजा बघत बसायची. टोमॅटो सॉस लावून पत्र परिषद घ्यायची, या शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

मुंबई फक्त ओरबाडण्यासाठीच त्यांना हवी काय?

मुंबईचे लचके तोडण्याचा तुमचा मनसुबा कित्येक जन्मात पूर्ण होणार नाही. मुंबई स्वतंत्र करायला निघालात त्यापेक्षा आमच्या हक्काचा जीएसटीचा पैसा वेळेत देत नाही. वरून पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करायला आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात.  मुंबई यांना फक्त ओरबड्यासाठी हवी आहे. तुमच्यासारखी आम्ही ती ओरबडत बसलो असतो ना तर असा जनसागर दिसला नसता.

मियांदादचा किस्सा अन् सोमय्यांची खिल्ली

टिकलेल्या फलंदाजाला डिस्टर्ब करण्यासाठी ‘स्लेजिंग’ केलं जातं. जावेद मियांदादने त्याचा किस्सा मातोश्रीवरील भेटीत सांगितला होता. ‘तेला लूम किधर है उधर सिक्सर मारना है’ असे जावेदने एका बॉलरला डिवचले होते. तसे काही तोतरे लोक सध्या बोलत असतात पण लक्ष देऊ नका, असा टोला ठाकरे यांनी किरिट सोमय्या यांचे नाव न घेता हाणला.

जवाब मिलेगा ; आज फडणवीस यांची सभा

‘अरे छट हा तर निघाला... आणखी एक टोमणे बॉम्ब... जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा’ अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर दिली. फडणवीस यांची रविवारी गोरेगाव; मुंबईच्या नेस्को मैदानावर जाहीर सभा होणार असून त्यात ते ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देतील असे त्यांनी रात्री ट्विट करून ठणकावले. मुंबई भाजपच्यावतीने आयोजित हिंदी भाषिक संकल्प संमेलनाच्या निमित्ताने ही सभा होणार आहे.
 

Web Title: shiv sena chief and cm uddhav thackeray criticize bjp over mumbai and maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.