shiv sena, bjp Alliance will win 220 seats in upcoming Assembly Elections says chandrakant patil | 'आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 220 जागा जिंकू'
'आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 220 जागा जिंकू'

ठळक मुद्देआगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या किमान 220 जागा जिंकल्याच पाहिजेत, ही आपली जिद्द आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्यांनी बारामतीत सुप्रिया सुळे कशा विजयी झाल्या? असा सवालही पाटील यांनी विरोधकांना विचारला. महाराष्ट्रात भाजपाला सर्वव्यापी सर्वस्पर्शी बनवण्याचा निर्धार करू, अशी अपेक्षाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या किमान 220 जागा जिंकल्याच पाहिजेत, ही आपली जिद्द आहे. असा निर्धार व्यक्त करत, जिथे भाजपा उमेदवार असतील तिथे आणि जिथे मित्र पक्षांचे उमेदवार असतील तिथेही भाजपा निवडणूक लढणार आहे हे जाणून सर्व 288 जागांवर कामाला लागण्याच्या सुचना महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. 

मुंबईमधील गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात आयोजित विशेष कार्यसमितीच्या बैठकीला संबोधित करताना चंद्रकांतदादा पाटील यांनी हे आदेश पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहेत. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, पक्षाच्या प्रदेश प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सचिव व्ही. सतिश,प्रदेश संघटन महासचिव विजयराव पुराणिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल,  रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थित होते.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शहा यांनी बळकट केलेली पक्ष संघटना, राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची यशस्वी कामगिरी हे सर्व आपल्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आहेतच, आता पुन्हा एकदा आपल्याला जनतेकडे त्यांचे असेच भरभरुन आशीर्वाद मिळवण्यासाठी जायचं आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता आपल्या पाठिमागे नक्कीच ठामपणे उभी राहिलच,' असं पाटील यांनी म्हटलं आहे. 

शिवसेना-भाजप युतीबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, युतीचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित भाई शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी जाहीर करतील. तो निर्णय आपण त्यांच्यावर सोपवला पाहिजे. पण आपण सर्वांनी सर्व शक्तीनिशी कामाला लागलं पाहिजे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवत पाटील म्हणाले की, 70 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवलं आहे. रेल्वेमधील शौचालये बायोटॉयलेटयुक्त करुन पंतप्रधान मोदीजींनी मोठी क्रांती घडवली. वारीला निर्मलवारी बनवण्यासाठी स्वच्छ वारी निर्मल वारी मोहीम, वारकऱ्यांना पाच लाख रेनकोट देऊन त्यांची मोठी सोय केली, हे  70 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला का जमलं नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्यांनी बारामतीत सुप्रिया सुळे कशा विजयी झाल्या? असा सवालही पाटील यांनी विरोधकांना विचारला. 

संघटनात्मक बांधणी बद्दल बोलताना पाटील म्हणाले की, संघटनात्मक बांधणीमुळे आपले जनतेशी थेट आणि घट्ट नातं  तयार झालं आहे. बूथ रचना आणि पन्ना प्रमुख या भाजपाच्या संघटनात्मक रचनेमुळे लोकसभा निवडणुकीत चमत्कार करून दाखवला. विधानसभा निवडणुकीत सुद्धा संघटनात्मक रचनेचा उपयोग करुन भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी होण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे. जनतेचा आपल्याला आशीर्वाद आहे,  त्यामुळे विरोधी पक्षांची काळजी करायचे काही कारण नाही.

पाटील पुढे म्हणाले की, संपूर्ण देशात भाजपाचा पक्का जनाधार निर्माण झाला आहे. पण आपल्याला त्यावर समाधान न मानता आपल्याला बरंच अंतर पुढे जायचं आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायजींचा अंत्योदयचा विचार राबविण्यासाठी आणि हे राज्य 'परम वैभवा'ला नेण्यासाठी आपल्याला भक्कम आणि खूप मोठा जनाधार हवा आहे. त्यासाठी आजपर्यंत भाजपापासून दूर राहिलेल्या समाज घटकांनाही आपल्याला जोडून घ्यायचे आहे. गरीब, श्रीमंत, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सुशिक्षित, अशिक्षित असे सर्वजण आपलेच आहेत. आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. यासाठी सदस्यता अभियान अत्यंत महत्त्वाचे असून, ते यशस्वी करायचे आहे. असा एकही बूथ राहता कामा नये, जिथे भाजपाचे किमान 25 सक्रिय कार्यकर्ते नसतील. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाला सर्वव्यापी सर्वस्पर्शी बनवण्याचा निर्धार करू, अशी अपेक्षाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

भाजपा विशेष कार्यसमितीच्या बैठकीत राज्यभरातील सर्व जिल्ह्यामधील हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषणानंतर सर्व कार्यकर्त्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीला घेऊन एक नवीन उर्जा संचारली असून कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेत भाजपा आणि महायुतीचा विजय निश्चित होणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले आहेत.


Web Title: shiv sena, bjp Alliance will win 220 seats in upcoming Assembly Elections says chandrakant patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.