Join us  

मध्यरात्री 12 वाजता पाणीपुरवठा करत असल्याने शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 1:27 AM

प्रत्येक विभागात ६ व ४ इंचच्या नवीन जलवाहिन्या टाकणे, पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली.

मनोहर कुंभेजकर 

मुंबई : मालाड पश्चिमेला असलेल्या मढ विभागाला अनियमित व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील भूमिपुत्र व नागरिक हैराण झाले आहेत. येथील भागाला सायंकाळी ६ ते ८ व मध्यरात्री १२.३० ते १.३० या वेळेत अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. महापालिका प्रशासनाने येथील पाण्याची एकच वेळ ठेवावी आणि मुबलक पाणीपुरवठा यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.

येथील आक्सा, एरंगळ, भाटी, धारवळी, मास्तर वाडी, कृष्णाचा पाडा, मढ गांव/कोळीवाडा, टोकारा, शिवाजीनगर इत्यादी भागाला सायंकाळी ६ ते ८ यावेळेत पाणीपुरवठा होतो. त्यात ६ ते ६.३० या वेळेत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने पाणी वाया जाते. येथील पातवाडी/लोचर गांव, धोंडीगांव, पास्कल वाडी या डोंगराळ भागाला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पाणी पोहोचत नाही. या डोंगराळ भागाला मध्यरात्री १२.३० ते १.३० या वेळेत पाणी येते. पहाटे लवकर उठून मासेमारीला येथील बोटी जातात. मात्र, पाण्यासाठी मध्यरात्री उठावे लागत असल्याने समस्या वाढत आहेत, असे शिवसेना नगरसेविका संगीता सुतार व समाजसेवक संजय सुतार यांनी सांगितले.पाण्याच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका उपजल अभियंता संजय आर्थे, कार्यकारी अभियंता नथुराम शिंदे, पश्चिम उपनगराचे कार्यकारी अभियंता रमेश पिसाळ, पी-उत्तर वार्डचे सहायक अभियंता राकेश शिंदे, दुय्यम अभियंता सचिदानंद कोरे यांनी एरंगळ, धारवळी, मास्तर वाडी, कृष्णाचा पाडा, मढ गांव/कोळीवाडा, पातवाडी/लोचर गांव, धोंडीगांव, पास्कल वाडी, टोकारा, शिवाजीनगर इत्यादी परिसराची पाहणी केली.

जल अभियंता अजय राठोड यांची भेट घेतली होती. मार्वे ते मढ मंदिरपर्यंत ९०० व्यासाची, मढ मंदिर ते जेट्टी ६०० व्यासाची नवीन जलवाहिन्या टाकणे, प्रत्येक विभागात ६ व ४ इंचच्या नवीन जलवाहिन्या टाकणे, पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. त्यावर लवकरात लवकर सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिल्याचे मच्छीमार नेते किरण कोळी यांनी सांगितले.