Join us  

ती स्कॉर्पिओ वाझेनी पार्क केली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस सापडलेली स्कॉर्पिओ निलंबित एपीआय सचिन वाझेने पार्क केल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस सापडलेली स्कॉर्पिओ निलंबित एपीआय सचिन वाझेने पार्क केल्याचा संशय एनआयएला आहे. त्याबाबत एनआयएकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्कॉर्पिओ ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची होती. ही कार १७ फेब्रुवारीला चोरी झाल्याची तक्रार त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात केली. प्रत्यक्षात ही कारचोरी झालीच नव्हती असे स्पष्ट झाले. ती १७ फेब्रुवारीपासून हिरेन यांचे मित्र असलेल्या वाझेनी दडवून ठेवली. ही कार २५ फेब्रुवारीला वाझेनेच चालवत कार मायकल रोडपर्यंत आणली आणि आधीच ठरवून ठेवलेल्या ठिकाणी उभी केली. तेथून निसटण्यासाठी वाझेनी इनोव्हा कारसोबत ठेवली होती. स्कॉर्पिओ ठरलेल्या ठिकाणी उभी केल्यानंतर वाझे या इनोव्हा कारमध्ये बसून निघून गेला. मात्र दोन तासांनी ताे पुन्हा या ठिकाणी आला. स्कॉर्पिओ न्याहाळून पुन्हा माघारी फिरला. यावेळी ओळख दडविण्यासाठी वापरलेला कुरता त्याने मुलुंड टाेल नाक्याजवळ जाळला, असा घटनाक्रम घडला असावा, असे एनआयएतील सूत्रांनी सांगितले.

याबाबत खातरजमा सुरू असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात वापरलेली इनोव्हा कार वाझेच्या पथकाला शासकीय वापरासाठी देण्यात आली होती. ही कार पोलीस आयुक्तालयात उभी करण्यात आली. तसेच त्यावरील नंबर प्लेट बदलण्यात आली. पुढे ही कार मुंबई पोलिसांच्या एमटी विभागातून एनआयएने जप्त केली.

* एनआयए अधिकारी पोलीस आयुक्तालयात

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्तालयात नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. नवीन आयुक्त असल्याने ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र भेटीमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

* वाझेच्या मालमत्तेबाबत ईडीकडून होऊ शकते चौकशी

वाझेच्या मालमत्तेबाबत ईडीकडून चौकशी होऊ शकते अशी माहिती ईडीच्या सूंत्रानी दिली. त्यामुळे वाझेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

..................