Join us  

‘ती’ मोलकरीण अल्पवयीन!, घरमालकांवर ‘चाइल्ड लेबर अ‍ॅक्ट’चा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:21 AM

स्वत:च्या मुलांना सांभाळण्यासाठी मध्य प्रदेशातील एका मुलीला तिच्या पालकांपासून दूर करून मुंबईत आणण्यात आले. आईवडिलांपासून दहा महिने लांब राहिल्यानंतर, तिला त्यांची आठवण येऊ लागली.

मुंबई : स्वत:च्या मुलांना सांभाळण्यासाठी मध्य प्रदेशातील एका मुलीला तिच्या पालकांपासून दूर करून मुंबईत आणण्यात आले. आईवडिलांपासून दहा महिने लांब राहिल्यानंतर, तिला त्यांची आठवण येऊ लागली. मात्र, मालकांनी तिला त्यांना भेटण्यास मनाई केली. या प्रकरणी स्थानिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर, वैद्यकीय चाचणीत ही मुलगी अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे.मधू (नावात बदल) या मुलीला दहा महिन्यांपूर्वी स्वत:च्या मुलांना सांभाळण्यासाठी मध्य प्रदेशहून एस. रेमंड कुटुंबीय मुंबईत घेऊन आले होते. अंधेरी एमआयडीसीच्या मूनलाइट सोसायटीत रेमंड दाम्पत्य मुलांसोबत राहत असून, एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांच्या घरी स्वयंपाक आणि अन्य कामांसाठी दोन नोकर आहेत. त्यामुळे मधूवर निव्वळ रेमंड यांच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास दहा महिने लांब राहिल्यामुळे मधूला तिच्या पालकांची आठवण येऊ लागली. त्यामुळे होळीच्या सुट्टीत तिला आईवडिलांना भेटायला जायचे होते. मात्र, तिच्या मालकांनी तिला परवानगी नाकारली. अखेर मधूने सोसायटीतील लोकांना हा प्रकार सांगितला. स्थानिकांनी पुढाकार घेत, तिला एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. मधूचा पोलिसांनी जबाब नोंदवत, घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मधूचे वय माहीत करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे उघड झाले.तिच्या घरमालकांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सध्या चाइल्ड लेबर अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.