Join us  

शरद पवारदेखील नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक : राज ठाकरे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत मी पत्राद्वारे मांडलेली भूमिका अत्यंत योग्य असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत मी पत्राद्वारे मांडलेली भूमिका अत्यंत योग्य असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः आपल्याला फोनवर सांगितले आहे. ते स्वतः कदाचित या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, असा खुलासा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी नाणार येथील शिष्टमंडळासमाेर केला.

कोरोनानंतर राज्याचे अर्थचक्र पुन्हा रूळावर आणण्यासाठी नाणार तेलशुद्धीकरण सारखे प्रकल्प अत्यंत महत्वाचे आहेत. अशी गुंतवणूक राज्याबाहेर जाता कामा नये, यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रविवारी पाठविले होते. नाणार प्रकल्पाच्या बाजूने राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर नाणार येथील रहिवाशांचे आणि समाजसेवी संस्थेच्या शिष्टमंडळाने सोमवारी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. नोटबंदी ते कोरोना या सर्व घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाले आहेत. आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नाणारसारखे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नयेत. मात्र, अशा प्रकल्पातून तयार होणारा रोजगार स्थानिकांच्या आणि मराठी माणसांना मिळायला हवा. यासाठी सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचेही राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

कोकणात आपल्याला पर्यटनावरच आधारित रोजगारनिर्मिती करायला हवी आणि भविष्यात त्यावरच लक्ष केंद्रित करू. पण नोटबंदी ते कोरोना ह्याकाळात प्रचंड बेरोजगारी वाढली. अशा ह्या विदारक स्थितीत ग्रीन रिफायनरीसारखे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नयेत, असे राज यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या नाणारबद्दलच्या भूमिकेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका योग्य असून, आम्ही त्याचे स्वागत करतो. मला त्यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. शिवाय, नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प ही ग्रीन रिफायनरी आहे. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील.